हानीकारक मांजाची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; नागरिकांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करू नये; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन...
Dec 15, 2025, 14:18 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आगामी मकरसंक्रांत सण नागरिकांकडून पतंग उडवून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पतंग उडविण्याच्या स्पर्धेत तरुण व लहान मुलांकडून नायलॉन, चायनीज तसेच इतर रासायनिक पदार्थ लावलेल्या मांजाचा वापर केला जातो. अशा नायलॉन, चायनीज व इतर रसायनमिश्रित मांजाच्या वापरामुळे यापूर्वी मानवी मृत्यू, दुखापती, पक्ष्यांना दुखापत व मृत्यू तसेच पर्यावरणाची हानी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने अशा प्रकारच्या मांजाच्या वापरावर पूर्णतः बंदी घातलेली आहे. हानीकारक मांजाची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, जिल्ह्रयातील नागरिकांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी म्हटले आहे की, आगामी काळात कोणीही पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंध केलेल्या मांजाचा वापर करू नये. पतंग उडवित असलेल्या लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे तसेच विजेच्या तारा असलेल्या ठिकाणी पतंग उडवू नये. मानव, पशु-पक्षी यांना दुखापत किंवा त्रास होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस स्टेशनच्या विशेष पथकांमार्फत आगामी काळात प्रतिबंधित मांजाची साठवणूक, विक्री व वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून, असा मांजा आढळून आल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता व तत्सम कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, शासन प्रतिबंधित मांजाबाबत माहिती असल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे, असेही तांबे यांनी आवाहन केले आहे.
