"पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा... नाहीतर पुन्हा महाराष्ट्र पेटेल!" — रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा;

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून भरून घेतले जातेय "पीक कर्ज न घेतल्याचे" हमीपत्र! बुलढाणा जिल्ह्यात केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच भरला विमा!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खरीप हंगामातील पीक विमा योजनेत नव्याने घालण्यात आलेल्या अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, बुलढाणा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. पीक विमा अर्ज करताना "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याने पीक कर्ज घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, "पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक तात्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल," असा इशारा दिला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप पीक विम्यासाठी अपेक्षित संख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून, केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या कमी प्रतिसादामागे नव्याने घालण्यात आलेल्या अटी आणि हमीपत्रामुळे निर्माण झालेला संभ्रम हे प्रमुख कारण असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर खर्च भागविण्यासाठी बहुतांश शेतकरी दरवर्षी बँकांकडून पीक कर्ज घेतात. अशा परिस्थितीत विमा अर्जासोबत 'मी पीक कर्ज घेतलेले नाही'असे हमीपत्र भरून घेण्यामागचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेत पीक कर्जधारक शेतकऱ्यांना विमा नाकारला जाणार का, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

याच मुद्द्यावरून रविकांत तुपकर यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. "आधीच पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यात आता अशा नव्या जाचक अटी लावून शेतकऱ्यांनाच विमा योजनेबाहेर ठेवण्याचा डाव सुरू आहे का? असा गंभीर संशय निर्माण झाला आहे," असे तुपकर म्हणाले.

जुनीच पीक विमा योजना लागू करा


शेतकरीहिताची जुनी, प्रभावी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्यात यावी आणि अशा सर्व जाचक अटी त्वरित रद्द कराव्यात अशी मागणीही रविकांत तुपकर यांनी सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी असलेली योजना जर त्यांनाच अडचणीत आणत असेल, तर त्याचा तीव्र विरोध केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला घालण्याचा प्रत्येक प्रयत्न आम्ही हाणून पाडू. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये," असा थेट इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
दरम्यान, पीक विमा अर्ज प्रक्रियेतील या नव्या हमीपत्रामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी संभ्रमात असून, संबंधित अटींबाबत शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. पीक विमा हा शेतकऱ्यांच्या संरक्षणाचा आधार आहे की त्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचे साधन, असा सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.