लोणार महसूल विभागात खळबळ! वकिलाशी गैरवर्तनाचा आरोप; नायब तहसीलदारांच्या बदलीसाठी वकील संघ आक्रमक! लेखी माफीनामा आणि तातडीच्या बदलीची मागणी; SDO कडे निवेदन, महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):लोणार येथील महसूल न्यायालयातील कथित गैरवर्तनाच्या प्रकारामुळे महसूल प्रशासन आणि वकील संघात तणाव निर्माण झाला आहे. सिरसाट येथील रस्त्याच्या वादासंदर्भातील प्रकरणात पक्षकाराचे वकीपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या लोणार तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. एस. ए. अवचार यांच्याशी नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी उद्धट व अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप वकील संघाने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ लोणार तालुका वकील संघाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत संबंधित नायब तहसीलदारांची तातडीने बदली करण्यासह लेखी व बिनशर्त माफीनाम्याची मागणी केली आहे.

वकील संघाने दिलेल्या निवेदनानुसार, सिरसाट येथील धर्मा गवई व इतर विरुद्ध ज्ञानेश्वर सिरसाट व इतर यांच्यात रस्त्याच्या हक्कासंदर्भातील वाद नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणातील संबंधित पक्षकाराला २७ सप्टेंबर रोजी नोटीस प्राप्त झाली होती. त्यानंतर पक्षकाराची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी ॲड. एस. ए. अवचार हे वकीपत्र घेऊन न्यायालयात हजर झाले.

यावेळी त्यांनी संबंधित पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी संधी देण्याची विनंती केली. मात्र, “सदर प्रकरण निकालासाठी बंद करण्यात आले असून वकीलपत्र स्वीकारले जाणार नाही,” असे नायब तहसीलदारांनी सांगितल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

‘तुझ्याकडून काय होते ते करून घे’ म्हणाल्याचा आरोप

वकील संघाच्या निवेदनानुसार, वकीपत्र स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर ॲड. अवचार यांच्याशी कथितरित्या अपमानास्पद भाषेत संवाद साधण्यात आला. “तुझ्याकडून काय होते ते करून घे” तसेच “तुझ्यासारखे लय वकील पाहिले” अशा शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप वकील संघाने केला आहे.

हा प्रकार पक्षकार, शासकीय कर्मचारी आणि इतर नागरिकांच्या उपस्थितीत घडल्याने ॲड. अवचार यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे वकील संघाने निवेदनात नमूद केले आहे.

‘बार आणि बेंचमध्ये परस्पर सन्मान आवश्यक’

महसूल न्यायालयीन कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी वकील आणि संबंधित अधिकारी यांच्यात परस्पर सन्मानाचे वातावरण असणे आवश्यक आहे. मात्र, अशा प्रकारच्या कथित वर्तनामुळे महसूल प्रशासन आणि वकील यांच्यातील संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका लोणार तालुका वकील संघाने घेतली आहे.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित नायब तहसीलदारांकडून लेखी व बिनशर्त माफीनामा घेण्यात यावा, त्यांची लोणार येथून तातडीने बदली करण्यात यावी आणि त्यांच्या अखत्यारितील सुरू असलेली प्रकरणे अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने वकील उपस्थित

लोणार तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रणजीत डव्हळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. सुधाकर अवचार, ॲड. विठ्ठल तनपुरे, ॲड. शिवाजी सानप, ॲड. सदाशिव मुंढे, ॲड. दीपक मापारी, ॲड. शिवम पालवे, ॲड. आशिष तिनगुरिया, ॲड. विष्णू वाघ, ॲड. निशांत वायाळ, ॲड. ओम भालेराव, ॲड. भूषण सानप, ॲड. गजानन आवारे, ॲड. संतोष भाकडे, ॲड. लहाने, ॲड. अवसरमोल आणि ॲड. फौजिया अली यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.

या आरोपांबाबत संबंधित नायब तहसीलदारांची बाजू किंवा प्रशासनाचे अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे वकील संघाच्या तक्रारीवर प्रशासन कोणती कारवाई करते, तसेच कथित गैरवर्तनाच्या आरोपांची चौकशी कशी होते, याकडे आता लोणारसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.