BIG BREAKING तुपकरांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल! ११ सप्टेंबरला मंत्रालयात शेतकरी प्रश्नांवर बैठक! तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित....

 
Tupkar

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे चार दिवसांपासून सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. आज चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती प्रचंड खालावली. दरम्यान आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सरकारचा निरोप घेऊन प्रशासनाचे अधिकारी रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र रविकांत तुपकर यांना देण्यात आले. त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात रविकांत तुपकर व शिष्टमंडळासोबत बैठक लावण्याचा शब्द देण्यात आला आहे. ११ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक होणार आहे. त्यामुळे रविकांत तुपकर यांनी तात्पुरते आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे..

आपल्याला सरकारने चर्चेला बोलावले आहे. सरकार आपल्यासोबत काय चर्चा करते, बैठकीत काय निर्णय होतो याची वाट पाहू. सरकारने बैठकीत आपल्या मागण्यांची दखल घेतली नाही तर मात्र १२ सप्टेंबर पासून पुन्हा आंदोलनाचा दणका सुरू करू असे रविकांत तुपकर म्हणाले.
भाऊ तुमची महाराष्ट्राला गरज...
दरम्यान त्याआधी राज्य सरकारच्या वतीने तुपकर यांना जेव्हा बैठकीचा निरोप आला तेव्हा तुपकर यांनी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली. सरकारचा आलेला निरोप तुपकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितला. आता आंदोलनाची पुढची दिशा काय ठरवायची हे तुम्हीच ठरवा, असे तुपकर शेतकऱ्यांना म्हणाले. त्यावर प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली.. "भाऊ तुमची महाराष्ट्राला गरज आहे, त्यामुळे कृपया अन्नत्याग आंदोलन स्थगित करा.." अशी विनंती शेतकऱ्यांनी केली. जे सरकार झुकायला तयार नव्हते , चर्चा करायला तयार नव्हते त्या सरकारने चर्चेचे निमंत्रण देणे हे आपल्या आंदोलनाचे यश आहे असा सूर यावेळी शेतकऱ्यांच्या भाषणातून उमटला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विनंतीचा मान ठेवत रविकांत तुपकर यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.