श्रींच्या पालखीचे उद्या जिल्ह्यात आगमण; सिंदखेड राजात स्वागताची तयारी पूर्ण नगरपालिका, महसूल व पोलिस प्रशासन सज्ज; शहरात भक्तिमय वातावरण..!

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे गेलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू आहे. या पालखीचे २३ जुलै राेजी जिल्ह्यात आगमण हाेणार आहे. बुधवार रोजी दुपारी सिंदखेडराजा शहरात पालखीचे आगमण हाेणार आहे. ‘गण गण गणात बोते’ च्या जयघोषात, भगव्या पताका, मंगल वाद्यांच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या सोबतीने येणाऱ्या या पालखीचे शहरात भव्य स्वागत होणार आहे.
श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्यावतीने आयोजित या ५६व्या वार्षिक पालखी सोहळ्यात सुमारे ७०० वारकरी सहभागी आहेत. पालखीने आतापर्यंत ७५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून, ४ जुलै रोजी पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुख्मिणीचे दर्शन घेतले होते. सध्या पालखी परतीच्या प्रवासात असून ६० दिवसांत तब्बल १३०० किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण होणार आहे.
शहरात पालखीच्या स्वागतासाठी नगरपालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रविणकुमार वराडे, पोलीस उपविभागीय अधिकारी मनिषा कदम, ठाणेदार इंगळे, दुय्यम ठाणेदार बालाजी सानप, अंमलदार श्रावण डोगरे व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत विदर्भाच्या प्रवेशद्वारावर होणार आहे.रामेश्वर संस्थानकडून वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, पालखीचा मुक्काम जिजामाता विद्यालयात राहणार आहे. गुरुवारी, 24 जुलै रोजी सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.