श्रींची पालखी पंढरपुरात पोहचली.... ३३ दिवसात ९ जिल्ह्यातून ७५० किमी पायी वारी!
Jul 5, 2025, 13:57 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): टाळ-मृदुंगाची ध्वनी। दिंड्या पताका घेऊनी ।।१।।
संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥
देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥
सर्व तीर्थांचे माहेर जनी म्हणे पंढरपूर ||४||
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी.....
या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातील भावनेप्रमाणे महाराष्ट्रातील विविध भागांतून निघालेल्या संतांच्या पालख्या दि.४ जुलै अखेर भूवैकुंठ पंढरपुरात पोहोचल्या आहेत. पावलो पंढरी वैकुंठ भुवन। धन्य आजी दिन सोनियाचा॥ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आलेले वारकरी भरून पावल्याची भावना व्यक्त करत आहेत.
राज्यासह देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे आज मंगळवेढा येथील दुपारच्या विसाव्यानंतर सायंकाळी ठीक चार वाजता पंढरपूर येथे आगमन झाले. आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होण्यासाठी तब्बल ३३ दिवसापासून नऊ जिल्ह्यातून ७५० किलोमीटर पायी प्रवास करत वारकरी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी तसेच आषाढी एकादशी उत्सवासाठी पंढरीत दाखल झाले आहेत.
श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथून दरवर्षी टाळ मृदंगाच्या गजरात श्रींची पालखी पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवासाठी जात असते. पालखीचे यंदा ५६ वे वर्ष आहे. यावर्षी पालखीमध्ये ७०० वारकरी सहभागी झाले आहेत. ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते असा नाम घोष आणि टाळ मुद्रांगाच्या गजरात मजल दरमजल करत ही पालखी संतनगरी कडून पंढरीकडे निघाली. आज पालखी आपल्या महत्त्वाच्या टप्प्यावर अर्थात पंढरपूरला सायंकाळी पोहोचेली. तत्पूर्वी प्रसिद्ध अशा मंगलवेढा येथे पालखीचा मुक्काम होता. श्री संत गजानन महाराज संस्थान सेवा ,शिस्त आणि स्वच्छता या त्रीसूत्रीसाठी जगात प्रसिद्ध असून पालखीत सुद्धा ही शिस्तबद्धता पाहायला मिळते.
शिस्तबद्ध पालखी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील श्री गजानन महाराजाचा पालखी सोहळा गण गण गणात बोते व टाळ मृदंगाच्या गजरात प्रमुख मार्गावरून मंगळवेढ्यात विसावला. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली. श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी ७०० वारकरी , ९ वाहन, २ घोडे , बँड पथक, सनई चौघडा वाद्यसह शिस्तबद्ध रांगा अशी तीर्थक्षेत्र शेगाव ते पंढरपूर दरम्यान पायी चालत प्रवास करीत पालखीचे ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
९ जुलै पर्यंत मुक्काम...
श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर शाखेत श्रींच्या पालखीचा ५ दिवस मुक्काम राहणार आहे. या ठिकाणी विविध धार्मिका कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यात भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन. इत्यादी. आलेल्या भाविकांना पंढरपूर शाखेत महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे दि.१० जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या _ जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. ३० जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ३१ जुलै रोजी गुरुवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.