SPOT REPORT बुलढाणा जिल्हा परिषदेत "खादाड" अधिकारी कर्मचाऱ्यांचा भरणा! जेवणासाठी लावतात "दीड⁻दोन" तास!दुपारनंतर रिकाम्या खुर्च्यांना हवा घालतात पंखे.!

 भरमसाठ विजेचा वापर,पंतप्रधानांच्या सूचनांना केराची टोपली! जेवणासाठी नियमानुसार घेता येतो केवळ अर्ध्या तासाचा ब्रेक..
 
 बुलढाणा (कृष्णा सपकाळ:बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा परिषदेचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे.."खादाड" अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भरणा जिल्हा परिषदेत झाला आहे.. या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अक्षरश: "खायला" वेळ पुरत नाही अशी स्थिती आहे.. शासनाच्या नियमानुसार दुपारच्या जेवणासाठी केवळ अर्धा तासाचा ब्रेक घेता येतो, मात्र बुलढाणा जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना खायला दीड दोन तासही कमी पडतात..एवढेच काय एकाच वेळी सगळ्यांनी "खाऊ" नये अशी शासनाची मार्गदर्शक तत्वे असताना सगळेच एका वेळेत खातात... ग्रामीण यंत्रणेचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेत दुपारनंतर शुकशुकाट असतो.. गाव खेड्यातून आलेल्या नागरिकांना अधिकारी कर्मचारी भेटत नाहीत..काही अधिकारी तर दौऱ्याच्या नावाखाली चक्क "डिंग्या" हाकलत असतात..आज ५ जूनच्या दुपारी "बुलडाणा लाइव्ह" ने बुलढाणा जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता नको त्या बाबी निदर्शनास आल्या..
 बुलडाणा जिल्हा परिषदेत दुपारी ३ वाजेच्या सुमारास शुकशुकाट होता. शासनाच्या नियमानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दुपारच्या जेवणाची वेळ १ ते २ अशी निश्चित करण्यात आली असून,त्यापैकी केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी घ्यावी असा नियम आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील सगळ्यांनी एकाच वेळी जेवणाच्या ब्रेकसाठी कार्यालय सोडू नये असाही शासन निर्णय आहे.१ ते २ या वेळीतील पहिल्या अर्ध्या तासात अर्धे अधिकारी/ कर्मचारी आणि दुसऱ्या अर्ध्या तासात उरलेले अधिकारी कर्मचारी यांनी सुट्टी घेणे अपेक्षित आहे. शासकीय कामासाठी आलेल्या कोणत्याही नागरिकाचे काम "साहेब जेवायला गेलेत" म्हणून अडवू नयेत अशाही मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र बुलढाणा जिल्हा परिषदेत यापैकी कोणताही नियम पाळल्या जात आहे. स्वतः जिल्हा परिषदेचे कॅप्टन असलेले गुलाबराव खरातच नियमांना "धाब्यावर" बसवतात,त्यामुळे बाकीच्या त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे तर विचारूच नका.
  "बुलढाणा लाइव्ह"ने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात फेरफटका मारला. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात कुणीही नव्हते, दरवाजा बंद होता.. साहेब कुठे गेलेत हे कुणाला विचारावे? अशी स्थिती होती. साहेबांच्या बंद खोलीत खोलीतील सर्व लाईट आणि पंखे चालू होते..युनिट जळत होते, पण साहेबांना कुठं स्वतःच्या खिशातून लाईट बील भरायचय? उपशिक्षणाधिकारी शेख यांच्या दालनाची ही तीच अवस्था..साहेब गायब, पण लाईट आणि पंखे बिनधास्त चालू होते. शिक्षण विभागातील इतर कर्मचारी जेवणासाठी गेल्याचे सांगण्यात आले, मात्र अपवाद वगळता तासाभरापासून गेलेले अनेक कर्मचारी परत आलेले दिसले नाही.
जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर तसे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे केबिन! साहेब दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांचाही दौरा होता म्हणे... कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अनगाईत यांच्या केबिनचा दरवाजा उघडा होता..आत भक्कम प्रकाशाचे लाईट सुरु होते, रिकाम्या खुर्चीला पंखा हवा घालत होता.. लेखा शाखा, सहाय्यक लेखाधिकारी यांच्या दालनात शुकशुकाट होता.. अनेक जण जेवायला गेले होते मात्र वेळ होऊनही कुणी परतले नव्हते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातही तीच अवस्था होती.. या संदर्भात विचारणा करण्यासाठी जन माहिती अधिकाऱ्यांकडे गेलो असता त्यांच्या दालनात ही शुकशुकाट दिसला.. जेवायला गेलेले अनेक जण "खाण्यात"व्यस्त होते! विशेष म्हणजे साहेबांना किंवा साहेबांच्या माणसांना देण्यासाठी "खाऊंचे" काही पार्सलही दुपारच्या वेळेत अधूनमधून कुणी घेऊन येत होते.. मात्र बहुतांश खाऊंचे पार्सल हे आवारात स्वीकारायचे नाहीत असा जिल्हा परिषदेचा नियम असल्याचेही सूत्रांकडूनही कळाले..मात्र तरीही काही जण स्वतःच्या दालनात देखील खाण्याचे पार्सल स्वीकारतात म्हणे...आता तुम्हीच सांगा जिल्हापरिषदेत कुणाकडून शिस्तीची अपेक्षा करावी?