पिंपळगाव सराईच्या जनता विद्यालयात खास उपक्रम! वसंतपंचमी निमित्त रंगली विविध भाषीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा...

 
 पिंपळगाव सराई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिंपळगाव सराई येथील स्थानिक जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव सराई येथे वसंत पंचमी (वसंतोत्सव ) च्या निमित्ताने विविध प्रांतातील वेगवेगळ्या भाषेतील देशभक्तीपर गीते यांची समूह गायनाची स्पर्धा घेण्यात आली.ही स्पर्धा चांगलीच रंगली..
 कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व सरस्वती पूजनाने झाली . वसंतोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा सरस्वती पूजन केले . या प्रसंगी कार्यक्रमाच्या वक्त्या सौ . वंदना लकडे यांनी वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन याचे महत्त्व विशद केले .या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या 'हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि बुद्धी, ज्ञान, संगीत आणि कलांच्या देवीचा म्हणजेच सरस्वतीचा जन्मदिवस आहे .सरस्वतीचे पूजन म्हणजेच या सृष्टीतल्या सृजनाचे पूजन'.
  वक्त्यांच्या उद्बोधनानंतर समूहगीत स्पर्धेला सुरुवात झाली . यामध्ये विद्यालयातील वर्ग पाच ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कन्नड, तामिळ, सिंधी, पंजाबी, गुजराती, कश्मीरी, बंगाली अशा विविध भाषांमध्ये विद्यार्थ्यांनी गीते गायिली. यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले . प्रत्येक भाषेतील गोडवा हा वेगळा कसा आहे आणि गीतांचा अर्थ जरी कळत नसला तरीही त्यातून देशभक्ती भावना कशी निर्माण होते हे त्यांनी सांगितले.
      या स्पर्धेत वर्ग पाच ते सात या गटातून बंगाली गीतासाठी वर्ग ५ वा (अ ) प्रथम , पंजाबी गीतासाठी वर्ग ६ वा (अ) द्वितीय, तेलगु गीतासाठी वर्ग ७ वा (अ)तृतीय तर आठ ते दहा गटातून आसामी गीतासाठी वर्ग ८ वा ( अ / क ) प्रथम, गुजराती गीतासाठी वर्ग ८ वा ब द्वितीय, मराठी गीतासाठी वर्ग ९ वा (अ) तृतीय असे क्रमांक काढण्यात आले . या स्पर्धेसाठी तज्ञ परीक्षक म्हणून अविनाश असोलकर आणि सुदाम चंद्रे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाचे संचालन वर्ग ७ वी ची विद्यार्थिनी कु. अनुष्का गवते हिने सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन कु. नेहा गायकवाड हिने केले . या कार्यक्रमात विद्यालयाचे पर्यवेक्षक भगवान आरसोडे, कलाशिक्षक रवींद्र खानंदे व जेष्ठ शिक्षक गजानन पाटोळे यांची उपस्थिती होती .