साेयाबीन, हळद पिकावर हुमणीचा अटॅक, चार तालुक्यातील पिके संकटात वेळीच व्यवस्थापन करा; कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना सल्ला.!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जिल्ह्यातील चिखली, मोताळा, देऊळगाव राजा व बुलढाणा तालुक्यातील शेतांमध्ये नुकत्याच झालेल्या कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त सर्वेक्षणात सोयाबीन व हळद पिकांवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही ठिकाणी हा प्रादुर्भाव लक्षणीय असून शेतकरी बांधवांनी वेळीच सामूहिक उपाययोजना करून नियंत्रणात आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ प्रवीण पी. देशपांडे व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल एस. झापे यांनी हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या आहे. ते याप्रमाणे:
प्रभावी उपाययोजना: शक्य असल्यास पिकामध्ये आंतरमशागत करावी व आंतरमशागत करताना जमिनीत असलेल्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
पाण्याचा मोकाट पद्धतीने वापर करून अळ्या गुदमरून मरतात व जमिनीवर येतात, त्यामुळे अशा पद्धतीचा अवलंब करावा. शेतातील तणांचा बंदोबस्त करावा. 
जैविक उपाय: मेटारायझीयम अॅनिसोप्ली या जैविक बुरशीचा 50 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या नोजलशिवाय पिकाच्या मुळाशी आळवणी करावी.
रासायनिक उपाय (लेबल क्लेम नसलेले): क्लोरोपायरीफॉस 20% प्रवाही 50 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी. (फिप्रोनील 40% + इमिडाक्लोप्रीड 40%) मिश्र कीटकनाशक 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
लक्षणे : हुमणी कीड ही बहुभक्षी असून तिच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने पिवळी पडतात, झाडे सुकतात. अशी झाडे उपटून तपासल्यास त्यांची मुळे कुरतडलेली आढळतात. अशा झाडांच्या मुळेजवळ २-३ इंच खोलीवर अळ्या आढळून येतात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळल्यास वरील उपायांची अंमलबजावणी करावी.