पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन...

 
 बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांची पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.


कृषी विभागाच्या माहितीनुसार, शेतातील जमिनीमध्ये किमान ६ इंच ओलावा अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे आवश्यक आहे. पुरेसा ओलावा नसताना घाईघाईने पेरणी केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे बियाण्यांचे अंकुरण कमी होण्याची किंवा अंकुर जळण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी शेतकरी धूळपेरणी करत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रकारची घाई टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, जिल्ह्यात सध्या समाधानकारक पावसाची सुरुवात झाली असून, पावसाची स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचे नियोजन करावे. जमिनीतील उष्णता कमी होऊन आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खरीप पिकांची पेरणी करता येईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संतोष डाबरे यांनी केले आहे.