चिखली तालुक्यात पाणीटंचाईवर उपाय : धोत्रानाईक, वरवंड आणि धानोरी गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू! उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती; दररोज हजारो लिटर पाणीपुरवठा होणार
May 27, 2025, 08:20 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली तालुक्यातील धोत्रानाईक, वरवंड आणि धानोरी या तीन गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशानुसार टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात चिखलीचे उपविभागीय अधिकारी यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
धोत्रानाईक गावात २,४३८ लोकसंख्या व १,२०० पशुधनासाठी दररोज ७२,७६० लिटर,
वरवंड येथे ८,००० लोकसंख्या व ८५० पशुधनासाठी दोन टँकरद्वारे १,७७,००० लिटर,
तर धानोरी येथे १,०५५ लोकसंख्या व ६०० पशुधनासाठी दररोज ७५,३०० लिटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची नियमित नोंद ठेवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. ही नोंदवही गटविकास अधिकारी नियमितपणे तपासतील. याशिवाय निविदाधारकाने टँकर नादुरुस्त झाल्यास तातडीने पर्यायी टँकर उपलब्ध करून द्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांनी ग्रामस्थांना दिलासा मिळणार असून, प्रशासनाकडून योग्य व्यवस्थापनाचे आश्वासन देण्यात आले आहे.