इन्कलाब जिंदाबादच्या नाऱ्यांनी बुलडाणा दणाणले! बुलडाण्यात निघाला अभूतपूर्व मोर्चा;नितेश राणेंना अटक करा अन् सभांवर बंदी आणण्याची मागणी...
Sep 6, 2024, 20:08 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणेंना त्वरीत अटक करावी. हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकरावी.पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे, सामाजिक तेढ निर्माण करने,दंगल घडविण्याचे षडयंत्र रचने, पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मज्जिदीमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे याप्रकरणी बुलडाणा शहर पोस्टेला नियमानुसार गुन्हा दाखल करावा यासह विविध मागण्यांसाठी बुलडाण्यात हिंदू- मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातील प्रथम निषेध- आक्रोश मोर्चा आज काढण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास हिंदू मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने यापुढे बुलडाणा जिल्हा बंदची हाक देण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
नितेश राणे यांना अटक करा, संविधान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद चे नारे देत बुलडाणा शहरातील इंदिरानगर येथून निषेध आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. आरोग्यधाम, बस स्टॅन्ड,नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक) जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मन्सूर सहाब इमाम, ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, हापिस मुजाहिद साहब, मौलाना मुजीब, यांनी मोर्चाला संबोधित केले.
सभेनंतर निवेदन देतेवेळी हाफीज रहमत खा, मुफ्ती जमीर , मौलाना समीर, समीर खान, मुफ्ती जमीर सिराजी,जयश्रीताई शेळके, हर्षवर्धन सपकाळ,मोहम्मद सज्जाद, शेख समीर,डॉ. मोबीन, बबलू कुरेशी,जाकीर कुरेशी, जुनेद डोंगरे, दानिश अजहर, असलम शाह, नदीम शेख,साबिर अली,बिलाल डोंगरे, हरीश रावळ, रिजवान सौदागर,आदींची उपस्थिती होती.