मोताळा येथील शेतकरी शुभम घोंगटे यांच्या हटके आंदोलनाची राज्यभर चर्चा! रोहित पवारांनीही सरकारला फटकारले! स्वतःच्या सोशल मीडिया आयडीवर केला मोताळ्याच्या आंदोलनाचा उल्लेख..

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): मोताळा तालुक्यातील शुभम घोंगटे या शेतकरी तरुणाने शेतकरी कर्जमाफीसाठी केलेल्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. शुभमने काल मोताळा तहसीलदारांना  एक हटके निवेदन दिले होते. साहेब आमची किडनी विकत घ्या पण सरसकट कर्जमाफी करा.असे थेट स्टॅम्प पेपरवर लिहून निवेदन निवेदन दिले होते.. आता या निवेदनाची दखल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील घेतली आहे.

 रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शुभम घोंगटे यांच्या आंदोलनाबद्दल लिहिले आहे. कर्जमाफीसाठी "शेतकऱ्यांना किडनी घ्या पण कर्जमाफी द्या" असं म्हणण्याची वेळ आल्याने ही सत्ताधाऱ्यांसाठी शरमेची बाब नाही का?असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. फसव्या अटी शर्तींसह कर्जमाफीच्या नावाखाली कर्ज वसुली करताना सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी  असा हल्ला रोहित पवार यांनी चढवला आहे.सरकारने फसव्या कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून वसुली करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रचंड संतापाचा सामना करावा लागेल असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.