लिंकींगमुळे युरियाचा तुटवडा! मका पिकावर गंभीर परिणाम; शेतकरी संकटात!
Jul 19, 2025, 10:19 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील चांडोळ व धाड परिसरात शेकडो हेक्टरवर खरिपात मका पिकाची लागवड करण्यात आली असताना, सध्या युरिया खताच्या तुटवडा निर्माण झाला आहे. पावसामुळे आधीच पिवळी पडलेली मका पिकं अधिकच कमकुवत होत असून, युरियाशिवाय त्यांची वाढ थांबण्याची शक्यता आहे. मात्र, युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दाही दिशा भटकावे लागत असून, कृषी विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
धाड परिसरात मागील काही वर्षांपासून सोयाबीन पिकावर वारंवार रोगप्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट आणि दरात घसरण होत होती. परिणामी, अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी हमीभाव असलेले मका हे पीक खरिपात निवडले. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मका पिकं पिवळी पडली असून, युरियाची तातडीने गरज आहे. केंद्र चालकांकडून युरियाचा पुरेसा साठा असूनही तो दिला जात नाही, तसेच काही ठिकाणी युरिया खताबरोबरच अनावश्यक खते खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे, असा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यातील युरिया खताचा रँक पॉइंट मलकापूर येथे आहे. तेथून जिल्हा वितरक कृषी केंद्र चालकांना खते पुरवतात. मात्र, मुख्य वितरकांकडून युरिया मागणीनुसार मिळत नसून, त्याऐवजी नॅनो युरिया आणि इतर खते खरेदी करण्याचा दबाव आणला जात असल्याचा आरोप अनेक केंद्र चालकांनीही केला आहे.लिकिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट करण्यात येत आहे.
