दुकान गेले, रोजगाराचा आधार हरपला! अतिक्रमण कारवाईनंतर आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या मलकापुरातील ४८ वर्षीय व्यावसायिकाचा गळफास घेऊन मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

 
 मलकापूर : (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुकान गमावल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या एका ४८ वर्षीय व्यावसायिकाचा मलकापूर येथे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी समोर आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अतिक्रमण कारवाईनंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर ते चिखली या राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महिनाभरापूर्वी करण्यात आली होती. या कारवाईत बुलढाणा रोडवरील जनता कॉलेजजवळ राहणारे बाळू किसन ढोले (वय ४८) यांचे सायकल दुरुस्तीचे दुकानही हटविण्यात आले होते. सदर दुकान हे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. मात्र, दुकान गेल्याने गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. दुकान बंद पडल्याचे दुःख आणि आर्थिक अडचणींमुळे ते चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे.

४ नोव्हेंबर रोजी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाऊ विजय किसन ढोले यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. आई, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार मागे ठेवून बाळू ढोले यांची एक्झिट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कारवाईनंतर रोजगाराचे साधन गमावलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही या घटनेच्या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.