लोणार तालुक्यातील कोयाळीत 'रि-युनियन' मराठी चित्रपटाचे शूटिंग; ग्रामीण भागाला मिळणार रुपेरी संधी

 
 लोणार (सचिन गोलेच्छा : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवराच्या सान्निध्यातील कोयाळी गावात लवकरच मराठी चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. 'रि-युनियन' या मराठी चित्रपटातील काही दृश्यांचे चित्रण येत्या दोन ते तीन महिन्यांत, कोयाळी येथील हर्षाबाई सदावर्ते आश्रमशाळेच्या परिसरात दोन दिवस करण्यात येणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक राकेश बारोट यांनी दिली.
मुंबईतील चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या राकेश बारोट व राजू सदावर्ते यांनी कोयाळी परिसराची पाहणी करून या ठिकाणास पसंती दर्शवली. या चित्रपटाचे इतर भाग मुंबई, गोवा या ठिकाणी चित्रित होणार असले, तरी ग्रामीण पार्श्वभूमी असलेले काही महत्त्वाचे प्रसंग कोयाळीमध्ये चित्रीत होणार आहेत.
लोणार परिसरातील निसर्गसंपन्नता, ऐतिहासिक हेमाडपंथीय मंदिरे, धार या स्थळांमुळे येथे पर्यटनासोबतच सिनेमा क्षेत्राचाही ओढा वाढू लागला आहे. यापूर्वीही काही हिंदी व मराठी चित्रपटांची चित्रिकरणे या परिसरात झाली असून, ‘रि-युनियन’सारख्या चित्रपटामुळे ग्रामीण भागाला रुपेरी पडद्यावर स्थान मिळणार आहे.
यावेळी बोलताना राकेश बारोट म्हणाले की, “कोयाळीतील चित्रिकरणादरम्यान स्थानिक कलाकारांनाही संधी देण्याचा आमचा मानस आहे. स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देत त्यांना मोठ्या व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.”
राकेश बारोट यांचा चित्रपट प्रवास
राकेश बारोट यांनी ‘स्वर्गाचा व्हीजा’ व ‘पप्पा परत या’ या मराठी चित्रपटांत लेखक, दिग्दर्शक व अभिनेते म्हणून योगदान दिले आहे. तसेच ‘लाहोर’ या हिंदी चित्रपटाच्या फर्स्ट वर्जनमध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे. मोहन जोशी, मिलिंद सोनामे, दीपाली सय्यद यांसारख्या मराठी कलाकारांसोबत त्यांनी काम केलेले आहे.
ग्रामीण भूमीवर चित्रीकरणाची नवचेतना
सतत महानगरांमध्ये शूटिंग करणाऱ्या दिग्दर्शकांनी ग्रामीण भागाकडे वळण्याची ही एक सकारात्मक पावले ठरत असून, अशा उपक्रमांमुळे स्थानिक संस्कृती, निसर्ग आणि कला यांना राज्यभरात व देशभरात अधिक व्यापक ओळख मिळण्याची संधी निर्माण होत आहे.