धक्कादायक! अंचरवाडीचे शेतकरी उचलणार टोकाचे पाऊल! नेत्यांचे अन् जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शब्द हवेत विरले! शासन झाले गरीब, पुलासाठी निधीच नाही म्हणते..
पावसाळ्यात अंचरवाडी ग्रामस्थांनी पुलासाठी केलेले जलसमाधी आंदोलन जिल्हाभर गाजले होते. मात्र धो धो कोसळणाऱ्या पावसात पहाटेच आ. मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनीदेखील फोनवरून अधिकाऱ्यांशी बोलून गावकऱ्यांना जलसमाधी आंदोलन स्थगित करायची विनंती केली होती. यावेळी १ जून २०२६ च्या आधी म्हणजे पावसाळा सुरु होण्याआधी पुलाचे काम मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आले होते. या आंदोनानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली मात्र या कामावर चर्चा झाली नाही.
त्यानंतर वेळोवेळी स्मरण देऊनही अद्याप पुलाचे काम सुरु झालेले नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरते.एकदा कशीबशी पेरणी आटोपल्यानंतर पुन्हा शेतात जाता येईलच याचा नेम नसतो. गेल्या वर्षी तर तब्बल आठ दिवस नदीच्या पलिकडे शेतात असणाऱ्या गोठ्यातील गुरांचा चारापाणी झाला नव्हता,काही शेतकऱ्यांची गुरे आजारी पडून मेली होती. वेळेवर फवारणी व इतर कामे न झाल्याने शेतीतून निम्मे उत्पन्नही निघाले नव्हते. गेल्या कित्येक वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांच्या नशिबी हेच असल्याने आता किती दिवस सहन करायच? शासन आमची दखल घेतच नसेल तर जगून काय फायदा? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत..
दरम्यान उद्या १० फेब्रुवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. दोन्ही पालकमंत्री जिल्ह्यात या निमित्ताने येणार आहेत. उद्याच्या बैठकीत या पुल प्रश्नावर सकारात्मक मार्ग निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
शेतकरी म्हणतात..
"आतापर्यंत अनेकदा निवेदने दिली, अधिकाऱ्यांना भेटलो..आंदोलन केले पण पुल प्रश्न मार्गी लागला नाही. आता आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्येची सामूहिक श्रूखंला करण्याचा निर्णय घेतला आहे.पुढच्या १० दिवसांत म्हणजेच २० फेब्रुवारी पर्यंत यासंदर्भात सकारात्मक मार्ग न निघल्यास दररोज १ याप्रमाणे पुढचे ६० दिवस ६० शेतकरी आत्महत्या करतील असा निर्णय आमच्या बैठकीत झाला आहे..कुणी गळफास घेईल, कुणी धरणात उडी घेईल, कुणी पेट्रोल ओतून पेटवून घेईल– विजय परिहार, शेतकरी