'शिवसृष्टी'ला वेग! आमदार श्वेताताई महालेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; चिखलीत साकारणार ६५ कोटींचा भव्य 'छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क',

१५ दिवसांत डीपीआर सादर करण्याचे मंत्र्यांचे आदेश

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. आमदार श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. यावेळी येत्या १५ दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ठाम ग्वाही पर्यटन मंत्र्यांनी दिल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.

 

हातणी व वळती येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी आमदार श्वेता महाले यांनी यापूर्वी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना पत्र देत मंत्रालयात बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत मंत्रालयात ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, जिल्हाधिकारी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे उपस्थित होते.

 

बैठकीदरम्यान पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "छत्रपती शिवाजी महाराज थीम प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. १५ दिवसांत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करावा." तर पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी आवश्यकतेनुसार पर्यटन विभागासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवता येणार आधुनिक तंत्रज्ञानातून

सुमारे ६५ कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिवंत केला जाणार आहे. भव्य प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक सभागृहे, परिषद केंद्र, बँक्वेट हॉल, एमटीडीसीचे सुसज्ज रिसॉर्ट, शिवकालीन इतिहास उलगडणारे संग्रहालय, महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दालन, ३६० अंश डोम शो, खुल्या आकाशाखालील भव्य रंगमंच, फूड कोर्ट, क्राफ्ट बाजार, मुलांसाठी मनोरंजन क्षेत्र, निसर्गरम्य पायवाटा आणि कुटुंबांसाठी विविध सुविधा या प्रकल्पात उभारल्या जाणार आहेत. यामुळे हा प्रकल्प केवळ पर्यटन केंद्र न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण आणि आधुनिक पर्यटनाचा संगम ठरणार आहे.

चिखलीला मिळणार राज्याच्या पर्यटन नकाशावर नवी ओळख

या प्रकल्पामुळे चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात नव्याने निर्माण होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अनुभव घेण्यासाठी राज्यासह देशभरातून पर्यटक येथे आकर्षित होतील. परिणामी पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हॉटेल, वाहतूक, हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि इतर पूरक व्यवसायांना मोठी संधी उपलब्ध होईल. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि परिसराच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल.

विशेष म्हणजे, अजिंठा लेणी, लोणार सरोवर, सिंदखेडराजा (राजमाता जिजाऊ जन्मस्थळ) आणि शेगाव (श्री गजानन महाराज मंदिर) या ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून चिखलीची नवी ओळख निर्माण होणार आहे. त्यामुळे आजवर प्रवासातील मार्ग म्हणून ओळखले जाणारे चिखली भविष्यात विदर्भाचे पर्यटन प्रवेशद्वार म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार श्वेता महालेंच्या पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक

'छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हा विषय आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची भावना व्यक्त होत आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या इतिहासात तो मैलाचा दगड ठरणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाला आधुनिक स्वरूपात जतन करणारे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण ठरणार आहे.