शिक्षक मतदार यादी संदर्भात शिवसेनेच्या प्रा. डी. एस लहानेंची मोठी मागणी! म्हणाले, संभ्रम दूर करा; माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना मतदानाची संधी द्या...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अमरावती शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या यादीत मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर करण्यात यावा व माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना मतदानाशी संधी द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे सहसंपर्कप्रमुख प्रा. डी. एस लहाने यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये मतदार नोंदणी करून मतदार यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. भारत निर्वाचन आयोगाच्या पत्रामधील 1.3.2 मधील तरतुदीमध्ये माध्यमिक शाळेचा उल्लेख आहे मात्र माध्यमिक शिक्षकांचा नाही. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक मतदानासाठी पात्र असावे असे डी. एस लहाने यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आज पर्यंत झालेल्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक मतदार म्हणून पात्र धरले होते, माध्यमिक शाळा मधील सर्व शिक्षकांनी आजपर्यंत सदर मतदारसंघात मतदान केले आहे.

आज रोजी अमरावती मतदारसंघाच्या नोंदणी मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी सर्व शिक्षकांची नोंदणी झालेली आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः बुलढाणा जिल्ह्यात नव्याने माध्यमिक शाळेतील वर्ग ९,१० व ११,१२ वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांची नोंदणी करण्याचे निर्देश दिल्या गेले आहेत, तसेच शासनमान्य सेल्फ फायनान्सच्या शाळा  इतर टेक्निकल संस्था विनाअनुदानित महाविद्यालय विनाअनुदानित अपंग /मूकबधिर शाळा/ मतिमंद शाळा येथील कार्यरत शिक्षकांना शिक्षणाधिकारी यांचे अप्रूव्हल  नसते ,संस्था स्तरावर ते कार्यरत असतात. त्यांची सुद्धा मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक असल्याचे प्रा. डी. एस लहाने यांनी म्हटले आहे. मात्र अनेक तालुक्यांमध्ये त्यांची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने नकार दर्शवला आहे, त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणी मधील संभ्रम तात्काळ दूर करण्यात यावे, कोणत्याही शिक्षकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू नये अशी मागणी प्रा. डी. एस. लहाने यांनी केली आहे.