

बुलढाण्यात शिवसेना महिला आघाडीचे जोडे मारो आंदोलन! कॉमेडियन कुणाल कामराच्या फोटोवर मारले जोडे...
Mar 25, 2025, 19:47 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कॉमेडियन कुणाल कामरा हा सुपारीबाज आहे. त्याने उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ खडसे यांची बदनामी केलेली आहे, त्याने लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कुणाल कामरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुणाल कामरा याच्या फोटोला जोडे मारून आंदोलन देखील करण्यात आले..
स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबन पर काव्य समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. कुणाल कामरा याने याआधी पंतप्रधान यांच्यावरही विडंबन काव्य केले होते. कुणाल कामरा हा विशिष्ट पक्षाकडून सुपारी घेऊन आमच्या पक्षाच्या नेत्यांवर जाणून-बुजून विडंबन करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना असला प्रकार खपवून घेणार नाही. त्याला जसेच्या तसे उत्तर देण्यात येईल. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.