शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले,शिवसेना सत्तेसाठी नाही तर समाजासाठी! नागरे कुटुंबीयांना मदत नव्हे तर कर्तव्यनिधी..

 

 शिवणी आरमाळ (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची शिकवण आहे. शिवसेनेचा जन्म हा समाजासाठी आहे, सत्ता असो वा नसो पण समाज महत्त्वाचा आहे. त्यामुळे सामाजिक जाणीवेतूनच स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना जिल्हा शिवसेनेने कर्तव्यनिधी दिला आहे अशा भावना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी व्यक्त केल्या. शिवणी आरमाळ येथे शहीद शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने ५ लक्ष रुपयांची बचत ठेव स्वरूपातील निधी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त करताना ते बोलत होते..

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आलेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच टप्प्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. एका दाण्याची हजार दाणे करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे, खऱ्या अर्थाने शेतकरीच जगाचा पोशिंदा आहे. अशा शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्व. कैलास नागरे यांची आत्महत्या समाजमन हेलावणारी आहे. शिवसेना नागरिक कुटुंबीयांच्या पाठीशी असून उद्धव साहेबांच्या सूचनेनुसारच जिल्हा परिषदेच्या शिवसेनेकडून ५ लक्ष रुपयांचा कर्तव्यनिधी कर्तव्यभावनेतून नागरे कुटुंबीयांकडे सोपवले आहेत असे यावेळी बुधवंत यांनी सांगितले..
 
अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली..
दरम्यान याआधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेतली. पाणी समस्येबाबत नागरे कुटुंबीय व गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी दोन दिवसांपूर्वी शिवणी आरमाळ पाणी समस्येबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेले निवेदन चुकीचे असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. शिवणी आरमाळ येथे पाणी पुरवण्यासाठी ८ किमी अंतर पडते त्यामुळे कैलास नागरे यांची मागणी पूर्ण होऊ शकत नव्हती असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली असे स्व. कैलास नागरे यांचे बंधू गणेश नागरे यांनी ना. अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले. वास्तवात ११० मीटरची चारणी खोदून हा प्रॉब्लेम सॉल होऊ शकतो हे गावकऱ्यांनी नकाशा दाखवून ना.दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले...