शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात सामाजिक उपक्रमांची रेलचेल; रक्तदान, अन्नदान, विद्यार्थ्यांचा सत्कारासह विविध कार्यक्रम!
कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे!जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचे आवाहन...
कार्यक्रमांची सुरुवात २४ जुलै रोजी बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपण आणि शेतकऱ्यांना मोफत वृक्षवाटपाने होणार आहे. याच दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे.त्यानंतर २६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता बुलढाणा येथील जगदंबा देवी मंदिरात देवीला पातळ अर्पण करून महाआरती होईल. सकाळी ९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात येणार असून, त्यानंतर मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानंतर बुलढाणा येथील गर्दे सभागृहात रक्तदान शिबिर, कार्यकर्ता मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. तसेच सायंकाळी पळसखेड येथील सेवा संकल्प आश्रमात अनाथ व निराधार बांधवांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक उपक्रमांना हातभार लावावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले आहे.