एसपी निलेश तांबेच्या विरोधात शिवसेना आक्रमक! जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपुतांसह ५ जणांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आमरण उपोषण;
एसपी निलेश तांबेच्या कार्यकाळात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. गुन्हेगारी वाढत आहे, चोरीच्या घटना वाढत आहेत. हातभट्टी दारू आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नाही, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू नाहीत. हजारो वाहने चोरी होत आहेत, अल्पवयीन मुलींचे अपहरण होत आहे. पोलीस अधिकारी कर्मचारी अवैध धंद्यात सहभागी आहेत. गाईंची चोरी होते, हत्या होते मात्र कारवाई नाही असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या सगळ्यांना कारणीभूत असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचे निलंबन व्हावे किंवा बदली व्हावी अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
सत्ताधाऱ्यांवर उपोषणाची वेळ..
राज्यात महायुतीची सत्ता आणि त्यातील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर उपोषणाची वेळ आली आहे. स्वतः शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपोषणाला बसलेले आहेत. याशिवाय सर्वच उपोषणकर्ते संजय गायकवाड यांची निकटवर्तीय आहेत. स्वतः आमदार संजय गायकवाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अतिशय जवळचे आहेत. असे असतांना शिवसेनेला थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा विषय टाकता आला असता. मात्र त्याऐवजी आमरण उपोषणाचा मार्ग का निवडला? याविषयी शहरात वेगवेगळ्या चर्चा आहेत.