

शिवसेना (उबाठा) कर्जमाफीसाठी महायुती सरकारला विचारणार जाब! २ मे ला जिल्हाधिकारी कार्यालयावर रणरणत्या उन्हात निघणार ट्रॅक्टर मोर्चा;
बुलढाणा येथे जिल्हा शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न! काश्मीर येथील भ्याड
Apr 24, 2025, 18:23 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ईव्हीएम ची कृपा(!) आणि फसव्या योजनांच्या निवडणूक पूर्व आश्वासनांमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारला मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे. "सत्ता द्या ,कर्जमाफी करू "अशी घोषणा केल्यानंतर तीन महिन्यातच या गोष्टीचा विसर महायुती सरकारला पडला आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करत राज्यातील फडणवीस- शिंदे - अजित दादा सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. २ मे ला शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी हा मोर्चा बुलढाणा जिल्हा मुख्यालयी निघणार असल्याची माहिती आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आली. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनात आज ही बैठक दुपारी पार पडली. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, आमदार सिद्धार्थ खरात, शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, श्री वसंतराव भोजने, सह संपर्क प्रमुख श्री छगन दादा मेहेत्रे, जिल्हा संघटक श्री डी एस लहाने सर, श्री गोपाल बछिरे, युवासेना जिल्हा प्रमुख श्री नंदु कऱ्हाडे, अँड श्री सुमित सरदार, म आ उप जिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, अशोक मामा गव्हाणे, माजी सभापती सुधाकर आघाव, डॉ अरुण पोफळे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, विजय इंगळे, निंबाजी पांडव, किसान धोंडगे, श्रीराम खेलदार, दिपक चांभारे, ईश्वर पांडव, प्रा सिद्धेश्वर आंधळे, मोहम्मद सोफियान, अपंग सेलचे गणेश सोनुने यांचेसह शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांचे उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विधानसभा संघटक, तालुका संघटक, उप तालुका प्रमुख, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला निर्णय हा शेतकरी कर्जमाफीचा घेत शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची अट न घालता दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली होती. शेतकरी आणि एकूणच शेती समस्या हा उद्धव साहेबांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याउलट या फडणवीस, शिंदे आणि अजित दादा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा सूर या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.ज्यावेळी निवडणुका होत्या विधानसभेच्या त्यावेळी महायुतीतल्या सर्व पक्षांनी राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला सांगितलं की आम्हाला सत्ता द्या आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. परंतु निवडणूक झाल्यानंतर तीन महिन्यातच अर्थमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या बाबीला नकार दिला. ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरसकटपणे त्यांनी कर्जमाफी न देण्याचे जाहीर केले आणि मोकळे होऊन गेले. ही बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्व जनतेचा विश्वासघात आहे. त्यामुळे या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दरम्यान पहलगाम कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप लोकांवर गोळीबार करण्यात आला. यात २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देखील यावेळी वाहण्यात आली.
या आहेत प्रमुख मागण्या :
१)महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पूर्ण करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी.
२) सोयाबीन, कापूस, मका यासह इतर शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा.
३) शेतकऱ्यांना बिना अटी शर्तीसह सरसकट पिक विमा देण्यात यावा.
४) तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचे रखडलेले अनुदान देण्यात यावे.
५)वन्य प्राण्यापासून शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीला तार कंपाउंड बसवून देण्यात यावे.
६) शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण वीज बिल माफ करून, त्यांना शेतीसाठी मोफत विज देण्यात यावी. यासह पाणीटंचाई व जिल्ह्यातील इतर प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे.