भव्य शिवजयंतीच्या तयारीला सुरुवात!बुलढाण्यात उद्या शिवप्रेमींची महत्त्वाची बैठक, शिवजयंती नियोजन व पदाधिकारी निवडही होणार ...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वात भव्य-दिव्य शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा केला जातो. आगामी शिवजयंती २०२६ च्या नियोजनासाठी बुलढाणा शहरातील शिवप्रेमींच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजमाता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
या बैठकीत शिवजयंती उत्सव २०२६ साठी अध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात येणार असून, संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट, शिस्तबद्ध व्यवस्थापन तसेच विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. बुलढाण्यातील शिवजयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध व ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व शिवप्रेमींचा सक्रिय सहभाग अपेक्षित असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तरी या महत्त्वाच्या बैठकीस बुलढाणा शहरातील सर्व शिवप्रेमी, कार्यकर्ते व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा (२०२५) चे अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष यांनी केले आहे.