शेगावात जि.प. कर्मचाऱ्यांचा महासंग्राम! राजेंद्र वाईनदेशकरांच्या कणखर आवाहनाने संपूर्ण जिल्हा एकवटणार; २३ ऑगस्टला ऐतिहासिक सभा अन् भव्य गौरव सोहळा!

 
 शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संतनगरी शेगावमध्ये रविवार, २३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मोठा मेळावा होणार असून, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या केंद्रीय कार्यकारिणी सभेसह भव्य गौरव व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ता आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे कणखर आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांनी केले आहे.

बुलडाणा

संतनगरी शेगाव येथील हॉटेल श्री गजानन इन, श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजजवळ, खामगाव रोड येथे सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. संघटनेचे नवनिर्वाचित राज्याध्यक्ष ॲड. बाबूराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण सभा पार पडणार आहे.

बलराम मगर यांच्या कार्याचा होणार गौरव

कर्मचारी चळवळीचे आद्यप्रणेते आणि संघटनेचे संस्थापक ‘कर्मचारी महर्षी’ म.वा. ओंकार साहेब यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांना एकत्र आणत संघटनेची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर माजी राज्याध्यक्ष बलराम मगर यांनी संघटनेचे नेतृत्व करत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी अनेक संघर्ष उभारले.

त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत या सभेत ‘गौरव व कृतज्ञता सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेसाठी आयुष्य वेचलेल्या माजी राज्याध्यक्षांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. माहूर येथे झालेल्या अधिवेशनात सर्वानुमते महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्याध्यक्षपदी निवड झालेल्या ॲड. बाबूराव पुजरवाड यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याला संघटनेच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रलंबित प्रश्नांवर होणार खल; पुढील संघर्षाची दिशा ठरणार!

केंद्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरावर शासनाकडे प्रलंबित असलेले विविध प्रश्न, संघटनेचा जमाखर्च तसेच आगामी काळातील आंदोलन आणि संघर्षाची रणनीती यावर सविस्तर चर्चा होणार आहे.त्यामुळे केवळ गौरव सोहळाच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या आगामी लढ्याची दिशा निश्चित करणारी महत्त्वपूर्ण बैठक म्हणून या सभेकडे पाहिले जात आहे.

“प्रत्येक कर्मचाऱ्याने शेगाव गाठावे!”

ही केंद्रीय कार्यकारिणी सभा बुलडाणा जिल्ह्यात, शेगाव येथे होत असल्याने तिचे यशस्वी आयोजन ही संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असल्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांनी म्हटले आहे. सभेच्या यशस्वी नियोजनासाठी बुलडाणा जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

“जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने शेगाव येथील सभेला व्यक्तिशः उपस्थित राहून हा सोहळा ऐतिहासिक करावा,” असे ठाम आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाईनदेशकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आता २३ ऑगस्टला शेगावमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची किती मोठी उपस्थिती राहते आणि या सभेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कोणते निर्णय होतात, याकडे संपूर्ण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे..