५–६ दिवसांपासून आजारी होती, कॉलेजला जात नव्हती अन् एके दिवशी अचानक गायब! लव्हाळा गावातील १९ वर्षीय युवती बेपत्ता! गोरा रंग, साडेचार फूट उंची, अंगात गुलाबी ड्रेस; कुणाला दिसली का ही मुलगी?
पोलिसांत ३० ऑक्टोबर रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, लव्हाळा येथील १९ वर्षीय युवती हिवरा आश्रम येथे एबीएमच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मात्र, आजारी असल्यामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून ती शिक्षणासाठी कॉलेजला जात नव्हती. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास तिची आई शेतात गेली होती. याचदरम्यान युवती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, गावात शोध घेऊनही ती मिळून आली नाही.
दरम्यान, बेपत्ता युवतीचा गावातील अभिषेक रामदास कुहिरे याच्यासोबत काही दिवसांपासून संपर्क सुरू असल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी संबंधित तरुणाच्या घरी जाऊनही युवतीबाबत चौकशी केली. मात्र, तेथेही ती मिळून आली नाही. त्यानंतर तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन लागत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गोरा रंग, साडेचार फूट उंची अन् गुलाबी ड्रेस; कुणाला दिसली का ही युवती?
वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता युवतीचे वय १९ वर्षे असून, तिचा रंग गोरा, उंची अंदाजे साडेचार फूट, बांधा मध्यम, केस काळे आणि डोळे काळे आहेत. घरातून निघताना तिच्या अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस होता. मुलीचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी साखरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून युवती बेपत्ता झाल्याची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कडुबा डोईफोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.