शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा; सिनगाव जहाँगीर शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला करणार उपस्थिती...
Jun 21, 2025, 08:45 IST
बुलडाणा (जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे हे सोमवार, २३ जून २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे सिनगाव जहाँगीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार ना. भुसे हे जालना येथून सकाळी ८.३० वाजता रवाना होऊन, सिनगाव जहाँगीर येथे पोहोचतील. सकाळी ९ वाजता शाळा प्रवेशोत्सव २०२५ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमानंतर सकाळी १०.३० वाजता ते शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण करतील. त्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक स्तरावर उत्साहाचे वातावरण असून, शालेय जीवनाच्या प्रारंभाला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.