शेळगाव आटोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संतोष भूतेकर बनले डॉक्टर! नेमकं मॅटर काय....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेळगाव आटोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पार दुर्दशा झाली आहे. स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे, आरोग्याचे मंदिर म्हणावल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णांची देखील प्रचंड गैरसोय होत आहे.. बऱ्याचदा वेळेवर डॉक्टर येत नाहीत, त्यामुळे रुग्णांना तासंतास बसून राहावे लागते..ही बाब शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी आज पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली..अनोख्या आणि हटके आंदोलनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भुतेकर यांनी आज चक्क स्वतःच डॉक्टर बनून प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांचा उपचार करून प्रतिकात्मक आंदोलन केले...
  यावेळी बोलताना संतोष भुतेकर म्हणाले की, यांना लाजा वाटत नाहीत का, हे लोक सरकारचा पगार घेतात आणि त्याबदल्यात जनतेची सेवा करायची सोडून डिंग्या मारतात. आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर येत नाहीत, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. अशा वेळेस सर्वसामान्य रुग्णांनी जायचे कुठे? असा सवाल त्यांनी केला. भुतेकर यांनी रुग्णालय परिसरात पसरलेली अस्वच्छता देखील चव्हाट्यावर आणली. आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल न घेतल्यास पुढील काही दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही भुतेकर यांनी दिला. यावेळी ऋषी भोपळे, ओम गायकवाड यांचीही उपस्थिती होती..