जिल्ह्यातील रेती घाटांना खरेददारच मिळेणा, चार महिन्यांत नऊ वेळा मुदतवाढ; अवैध तस्करी बिनधास्त सुरूच!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील ४१ रेती घाटांपैकी ३८ घाटांना खरेदीदारच मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यातील केवळ तीनच रेती घाटांचा लिलाव झाला आहे. गेल्या चार महिन्यांत नऊ वेळा लिलावासाठी निविदांची मुदतवाढ देण्यात आली, तरीही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, जिल्हा प्रशासन अडचणीत आले असून, सामान्य जनतेला घरबांधणीसाठी अव्वाच्या सव्वा दराने रेती खरेदी करावी लागत आहे.

२५ एप्रिल २०२५ पासून सुरू झालेल्या निविदा प्रक्रियेला आतापर्यंत नऊ वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. २८ जुलै २०२५ ही नवव्या मुदतवाढीची अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. लोणार तालुक्यातील फक्त ३ घाटांचे लिलाव झाले, उर्वरित २३ घाटांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.५ घाट पर्यावरण समितीकडून तांत्रिकदृष्ट्या नामंजूर, तर ९ घाट अजूनही मंजुरीसाठी प्रलंबित.

चढ्या दराने रेतीची विक्री सुरू 
घाट न सुरू झाल्याने नागरिकांना गरज असल्यास तस्करांकडून महाग दराने रेती खरेदी करण्याची वेळ येते.
रेती तस्कर मात्र मोकाट आहेत – लाखो ब्रास रेतीचा अवैध उपसा करून कोट्यवधींची कमाई करण्यात आली आहे.
खडकपूर्णा धरण, पूर्णा नदी व इतर भागांतून अवैध उत्खनन सुरूच असून महसूल विभागाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.

२५ टक्के डिपॉझिटची अडचण 
रेती घाटांचे लिलाव कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचतात.
निविदेसाठी लागणारी २५ टक्के अनामत रक्कम व तीन निविदा भरण्याची अट ही अनेक इच्छुकांसाठी अडथळा ठरत आहे.
रेतीमाफीया सुसाट 
जिल्ह्यात रेती घाटांचा लिलाव हाेत नसताना दुसरीकडे रेतीमाफीया सुसाट असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या कारवाईनंतरही रेतीचे उत्खनन करून वाहतुक जाेरात सुरू आहे.