शेळगाव आटाेळ येथे प्राथमिक आराेग्य केंद्र, मंदिराच्या परिसरातच अवैध दारु विक्री; ग्रामसभेत घेतलेला दारुबंदीचा ठराव कागदावरच; अवैध दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे निवेदन..!
Updated: Sep 17, 2025, 20:19 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंढेरा पाेलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या शेळगाव आटाेळ गावात गत काही दिवसांपासून अवैध दारु विक्री माेठ्या प्रमाणात हाेत आहे. गावातील प्राथमिक आराेग्य केंद्र आणि अंबिका माता मंदिराच्या परिसरातच अवैध दारु विक्री माेठ्या प्रमाणात हाेत असल्याने अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत. विशेष म्हणजे २९ एप्रिल २०२२ राेजी ग्रामसभेत घेतलेला दारुबंदीचा ठराव कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. तसेच दारुबंदी विभागासह जिल्हाधिकारी, जिल्हा पाेलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
शेळगाव आटोळ गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरू आहे. त्यामुळे, गावातील युवक व्यसनाधीन हाेत असून सामाजिक वातावरण बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर युवा मित्र मंडळ यांच्या वतीने जिल्हा दारूबंदी विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गावाच्या शांततेसाठी व तरुणाईचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन दारूबंदी विभाग, जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, स्थानिक अंढेरा पोलीस ठाणे तसेच ग्रामपंचायत शेळगाव आटोळ यांना देण्यात आले आहे.