देशसेवेत प्राणांची आहुती! उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावताना चिखलीचा सुपुत्र हवालदार हरिदास कापसेंचा मृत्यू; मुलीच्या वाढदिवशी ऑनलाइन भेट पाठवली, केक कापताना व्हिडिओ कॉल केला पण...सगळ संपलं होत..!

 आज मायभूमीत अखेरचा निरोप, तालुका क्रीडा संकुलात कडक बंदोबस्त

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा (: देशाच्या सीमेवर आणि देशसेवेच्या कर्तव्यावर असताना चिखली तालुक्यातील सुपुत्र हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय 36) यांचा उत्तराखंडमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. देशसेवेचे कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर जवानाचे पार्थिव आज, 10 ऑगस्ट रोजी चिखलीत दाखल झाले असून थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हरिदास कापसे हे उत्तराखंडमधील लापथल पोस्टवर हेड कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत होते. कर्तव्यावर जात असताना 9 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्या छावणीतील पायऱ्या उतरताना अपघात झाला. त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती स्थिर असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला; मात्र ड्युटीवर जात असताना पुन्हा चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. आरएमओंनी तातडीने उपचार केले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हरिदास कापसे हे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मूळ युनिटचे असून सध्या 411 स्वतंत्र पॅरा फील्ड कंपनी, आग्रा येथे सेवेत होते. उत्तराखंडमधील लापथल पोस्टवर हायड्रो प्रोजेक्टच्या बांधकामासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

वाढदिवसाच्या दिवशीच काळाने घातला घाला!

हरिदास कापसे यांचा जन्म 15 ऑगस्ट 1990 रोजी झाला होता. स्वातंत्र्यदिनाच्या काही दिवस आधी जन्मलेल्या या देशभक्त जवानाचे पार्थिव आता स्वातंत्र्यदिनाच्या उंबरठ्यावर त्यांच्या मायभूमीत दाखल झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या तीन वर्षीय कन्या वैदेहीचा 7 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी ऑनलाइन भेट पाठवली होती; मात्र त्याच रात्री कुटुंबीयांनी केलेला व्हिडिओ कॉल त्यांनी उचलला नाही. त्यानंतर ही दुर्दैवी बातमी समोर आली.

तीन महिन्यांपूर्वीच आईचे निधन; आता कुटुंबावर दुहेरी आघात

हरिदास यांच्या मातोश्रींचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यातून सावरत असतानाच कुटुंबावर हरिदास यांच्या मृत्यूचे दुःख कोसळले आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी वृषाली, मुलगा ऋग्वेद, मुलगी वैदेही आणि दोन भाऊ असा परिवार आहे. ऋग्वेद हा बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात शिक्षण घेत आहे.

शासकीय इतमामात अखेरचा निरोप

उत्तराखंडहून दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर आणि तेथून चिखली येथे हरिदास कापसे यांचे पार्थिव आणण्यात आले आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव चिखलीत पोहोचले. तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.देशाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी चिखलीकर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.