केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची उपस्थिती...

 
बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि देशाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज बुलढाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर तसेच संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेनंतर मान्यवरांच्या हस्ते अधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीतील विविध निर्णय आणि योजनांचा आढावा घेण्यात आला. देशाची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, डिजिटल व्यवहार व्यवस्था आणि जनकल्याणकारी योजनांमध्ये झालेल्या प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणे, सर्जिकल स्ट्राइक, बालाकोट एअर स्ट्राइक यांसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित निर्णयांचा उल्लेख करण्यात आला.
डिजिटल व्यवहार क्षेत्रात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवे बळ दिल्याचे सांगण्यात आले. तसेच अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल आणि केदारनाथ पुनर्विकास प्रकल्पांद्वारे सांस्कृतिक वारसा संवर्धनालाही चालना मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
बुलढाणा जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेताना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात १० लाख ५० हजारांहून अधिक आयुष्मान कार्डांचे वितरण झाल्याची माहिती देण्यात आली. खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण प्रगती झाल्याचेही सांगण्यात आले. या मार्गासाठी भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
शेतकरी कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान योजनांद्वारे वार्षिक १२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २०२२ ते २०२६ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील १३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १४०८.८९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
केंद्र सरकार गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उन्नतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून विकासाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत लाभ पोहोचविण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.