खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी चिखली व बुलडाणा तालुक्यांची आढावा बैठक! आ. श्वेताताईंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना; खत, बियाण्याची कमतरता पडू देऊ नका!

 पिक कर्जाचाही घेतला आढावा...अधिकाऱ्यांच्या कागदी उत्तरांवर श्वेताताईंची नाराजी...
 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिखली आणि बुलढाणा येथे आयोजित तालुकास्तरीय पूर्व नियोजन बैठका नुकत्याच पार पडल्या. या बैठकीत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी कृषी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना विविध त्रुटींवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचा इशारा दिला. यावेळी आ.श्वेताताईंनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर विविध बाबींचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. अधिकाऱ्यांकडून आलेल्या कागदी उत्तरांनी आ. श्वेताताईंचे समाधान झाले नाही. कागदी कारवाई नको, प्रत्यक्ष ग्राउंड वर काय? असा सवाल करीत त्यांनी झपाट्याने कामाला लागण्याच्या सूचनातील. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, यासाठी कृषी विभागाचे मोठे योगदान असले पाहिजे.. शेतकऱ्यांनी कृषी विभागाला शोधल्यापेक्षा, कृषी विभागाने शेतकऱ्यांचा पोहचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अपेक्षित अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणत त्यांनी विभागांतील समन्वयाचा अभाव हा मोठा प्रश्न असल्याचे सांगितले. विशेषतः फलोत्पादन योजनांचा प्रचार व विस्तार कमी असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीच्या प्रक्रियेत मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्याचे त्यांनी सांगितले. कोड तयार करणे, मस्टर प्रक्रिया आणि अनुदान थेट खात्यात जमा करण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
पीककर्जापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांनी बँका आणि सहकार विभागाला जाब विचारत, कर्जवाटप प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश दिले. खते, बियाणे आणि कृषी कर्ज शेतकऱ्यांना योग्य दरात व वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी कृषी, सहकार, महसूल आणि कृषी सेवा केंद्रांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंधारणाशी संबंधित कामांमध्येही गती आणण्याचे निर्देश देत सिमेंट नाला बांध, माती नाला बांध आणि पाझर तलावांच्या दुरुस्तीची कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
यंदाच्या हंगामात चिखली तालुक्यात सुमारे ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायांकडेही वळावे, असे आवाहन त्यांनी केले. फलोत्पादन वाढीसाठी विविध योजनांचा प्रभावी वापर व्हावा यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
मागील वर्षी हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचा संदर्भ देत यंदा प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेत राबविण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले. तसेच कापूस उत्पादनवाढीसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची घोषणाही त्यांनी केली.
तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना महाविस्तार एआय अ‍ॅपच्या वापराचे त्यांनी कौतुक केले, तर AGRISTACK अंतर्गत शेतकरी नोंदणी वाढविण्याची गरज अधोरेखित केली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दरम्यान, बुलढाणा तालुक्यातील गावांसाठी स्वतंत्र आढावा बैठक बुलढाणा येथे पार पडली. ही बैठक आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरावा यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.