उद्या महसूल मंत्री बावनकुळे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर! दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करणार; खामगावात नागरिकांची निवेदने स्वीकारणार

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या, शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

महसूल मंत्री बावनकुळे यांचा दौरा अकोला जिल्ह्यातील कार्यक्रमाने सुरू होणार असून, त्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यात दाखल होतील. दुपारी १.३० वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते खामगावकडे रवाना होतील.दुपारी ३ वाजता खामगाव येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांची निवेदने स्वीकारण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी नागरिक, शेतकरी तसेच विविध संघटनांकडून आपल्या मागण्या व प्रश्नांबाबत निवेदने सादर केली जाणार आहेत.

यानंतर बावनकुळे हे सायंकाळी ५.१५ वाजता मलकापूर तालुक्यातील रणथाम येथे पोहोचणार असून, दुष्काळग्रस्त भागातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली जाणार आहे.दरम्यान, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शेतपिकांचे नुकसान, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रत्यक्ष पाहणीदरम्यान कोणता आढावा घेतला जातो, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.