अतिक्रमण हटाव..! बुलडाण्याच्या इक्बाल चौकात बुलडोझर चालला...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील इकबाल चौकातील जामा मस्जिद परिसरात असलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम बुलडाणा नगरपालिकेने हाती घेतली. मजूरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे तगड्या बंदोबस्तात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली..
काल,२३ जानेवारीच्या सकाळपासूनच नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. ४ जेसीबी ,ट्रॅक्टर आणि नगरपालिकेचे ११८ कर्मचारी ही मोहीम राबवित होते. स्वतः मुख्याधिकारी गणेश पांडे, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यावेळी उपस्थित होते. वर्षभराआधी अतिक्रमणामुळे एका दहा वर्षीय मुलाचा अपघात होऊन निधन झाल्याची घटना इक्बाल चौक परिसरात घडली होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवले होते, मात्र पुन्हा हे अतिक्रमण जैसे थे झाले होते. दरम्यान आता बुलढाणा शहरातील विविध ठिकाणचे देखील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अतिक्रमण, जयस्तंभ चौक,संगम चौक या ठिकाणचे देखील अतिक्रमण काढले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली आहे..