"धर्म भावनेला दिला मान... बंद राहणार मांसविक्रीचे प्रत्येक दुकान!" महावीर जयंतीसाठी जिल्ह्यात विशेष आदेश जारी

 
 बुलढाणा (जिमाका :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – जिल्ह्यात १० एप्रिल रोजी महावीर जयंती आणि १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी होणार आहे. यानिमित्त कत्तलखाने आणि मांसविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी (१० एप्रिल) मांसविक्रीवर पूर्णतः बंदी राहणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत मांस विक्री न करण्याची दक्षता घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
सध्या राज्यात राजकीय आंदोलने, धार्मिक संवेदनशीलता, जातीय तणावाच्या घटना, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने खबरदारीचे उपाय अंमलात आणले आहेत. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, जैन समाज व इतर भाविकांकडून मिरवणुकांचे आयोजन देखील होणार असल्याने, या पार्श्वभूमीवर बंदोबस्त अधिक चोख ठेवण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.