नामस्मरण आणि अन्नदान अट्टाहासाने करा - श्रीहरी महाराजांचा उपदेश! बुलढाण्यातील नामजप शिबिर उत्साहात; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद...
रामनामाचा प्रसार आणि प्रचारासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालत असलेले समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बुलढाणेकर भाविकांनी तीन दिवसीय नामजप शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी सांगता प्रसंगी मुख्य मार्गदर्शनात ते बोलत होते. प.पू. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान विघ्नहर्ता गणेश मंदिर पाळणाघराजवळ रामनगर बुलढाणा येथे हे शिबिर पार पडले. यावेळी श्रीहरी महाराज म्हणाले, "जैसे खावे अन्न तसे होते मन", त्यामुळे ज्या आहारातून सात्विकता अंगी येईल असा आहार घ्यावा. सद्गुरूंचे व्यासपीठ हे मोठ आहे. नाम आणि देव वेगळे नाहीत. जिथे नाम आहे तिथे देव नक्की आहे. आपण निर्भयतेने नाम घेतलं तर सद्गुरु आपल्याला शोधत येतील. प्रपंचामध्ये आज अनेक अडचणी आहेत. संस्कृती सुटत चालल्यामुळे घराघरात अनेक समस्या उद्भवत आहेत. दुराचारी यांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे ज्याच्या घरात संस्कृती टिकेल, त्याचा प्रपंच नेटका होईल. मुला बाळांवर संस्काराचे बीजारोपन करा. नामस्मरणाचा मार्ग सोडू नका. सद्गुरु प्रल्हाद महाराजांची दासत्व सेवा आपली सुरू आहे. तुम्ही देखील मनाशी ठरवा.पक्का निग्रह करा.भगवंत दयाळू आहे ,तो नक्कीच कृपा करील. संत, सद्गुरु भगवंताची गाठ घालून देतात. मात्र त्यासाठी त्यांनी सांगितलेला नामस्मरणाचा मार्ग आपल्याला प्राणपणाने जपायला हवा असेही श्रीहरी महाराज म्हणाले.