रविकांत तुपकरांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात! मातृतीर्थ सिंदखेडराजात राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन लढ्याला सुरूवात; तुपकर म्हणाले, ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई;
सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही....
सिंदखेडराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ठरल्याप्रमाणे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज,४ सप्टेंबरच्या दुपारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थानासमोर त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळीच आंदोलनाला सुरुवात करण्याआधी रविकांत तुपकर यांनी अतिवृष्ट ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर तुपकर हजारो शेतकऱ्यांसह सिंदखेडराजात पोहचले. राष्ट्रमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन तुपकर आंदोलनस्थळी टाकलेल्या मंडपात पोहचले. तिथे उपस्थित शेतकऱ्यांना तुपकर यांनी संबोधित केले. आता शेतकरी एकवटला आहे. आपल्या आंदोलनाचा श्वास सोयाबीन कापूस आहे, आता आपला कुणी नेता नाही आता सोयाबीन हाच आपला नेता..मी केवळ निमित्त आहे, आता आपला लढा आपल्या शेतकऱ्यांनाच पुढे न्यावा लागेल. आता सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचे नाही. ही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची लढाई आहे असे तुपकर यावेळी म्हणाले.