रविकांत तुपकरांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला मलकापुरातून दणक्यात सुरुवात! हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ; शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकावर माथा टेकवला, तुपकरांनी सरकारवर डागली तोफ!

 “सरकारच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून घेतल्याशिवाय थांबणार नाही! अन्यथा शेतकऱ्यांचा हिसका दाखवू...” रविकांत तुपकरांचा मलकापुरातून एल्गार; वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांनी हिरवी झेंडी दाखवताच दुष्काळ संघर्ष यात्रेचा शंखनाद; “५ हजारांची मदत नको, हेक्टरी एक लाख द्या!” 

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) : “शेतकरी आणि सैनिक आहेत म्हणून हा देश जिवंत आहे! मात्र, आज देशाचा जवान आणि जगाचा पोशिंदा शेतकरी दोघेही आतल्या आत गुदमरत आहेत. दुष्काळ येणार हे सरकारला वर्षभर आधी माहीत होतं, मग शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणून ठेवलं? सरकार हातावर हात ठेवून बसलं आहे. आता घरात बसून न्याय मिळणार नाही. रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्ही फक्त साथ द्या, सरकारच्या नरडीवर पाय देऊन तुम्हाला मदत मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही. कशी मदत मिळत नाही तेच पाहतो!” अशा आक्रमक शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज मलकापूरच्या भूमीतून सरकारविरोधात संघर्षाचा शंखनाद केला. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बहुचर्चित 'दुष्काळ संघर्ष यात्रे'ला आज, १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दणक्यात सुरुवात झाली. पुलवामा हल्ल्यातील शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन केल्यानंतर वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. 'जय जवान, जय किसान'च्या घोषणांनी मलकापूर दुमदुमले. विशेष म्हणजे, ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाची घोषणा करतानाच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सरकारला शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा तुपकरांनी दिला. त्यामुळे या संघर्ष यात्रेकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

दुष्काळ संघर्ष यात्रेच्या पहिल्याच दिवशी भावनिक वातावरण पाहायला मिळाले. रविकांत तुपकर यांनी सकाळी बुलढाणा येथील आपल्या निवासस्थानी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर आणि राधा वहिनी यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर यात्रेसाठी सज्ज करण्यात आलेल्या 'लोकरथा'चे विधिवत पूजन करण्यात आले. कुटुंबीयांचे आशीर्वाद घेऊन तुपकर मलकापूरच्या दिशेने रवाना झाले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पुकारलेल्या या संघर्षाची सुरुवात घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने झाली, तर मलकापूरमध्ये शहीद जवानाच्या स्मृतींना अभिवादन करून यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.मलकापूर येथे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला रविकांत तुपकर यांनी अभिवादन केले. यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी सुषमाताई राजपूत, त्यांचे पुत्र जय आणि शुभम राजपूत यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. सुषमाताई राजपूत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दुष्काळ संघर्ष यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेतकरी आणि सैनिक यांच्यातील नाते अधोरेखित करत 'जय जवान, जय किसान'चा नारा देण्यात आला. कष्टकरी शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या नांगराचे पूजनही करण्यात आले. प्रारंभी झालेल्या सभेनंतर सभास्थळापासून तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकालाही अभिवादन करण्यात आले. “सुषमाताई, तुम्ही एकट्या नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. देश सुरक्षित राहिला पाहिजे आणि त्यासाठी सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. मलकापूरमध्ये शहीद संजयसिंह राजपूत यांचे भव्य स्मारक उभे राहावे, यासाठी आपण पुढाकार घेऊ,” असा शब्दही तुपकरांनी यावेळी दिला.

“अल निनोचे संकट येणार, दुष्काळ पडणार, याची कल्पना सरकारला वर्षभर आधी होती. मग सरकारने आधीच उपाययोजना का केल्या नाहीत? शेतकरी आणि शेतमजुरांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणून का ठेवलं? एवढे प्रश्न असताना सरकार हातावर हात ठेवून बसलं आहे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला दिसत नाहीत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “देशाला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही. क्रांतिकारकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं म्हणून स्वातंत्र्य मिळालं. घरात बसून क्रांती होत नसते. शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या हक्कांसाठी आता रस्त्यावर उतरावंच लागेल. सरकारवर दबाव निर्माण करून दुष्काळग्रस्तांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठीच ही यात्रा काढली आहे,” असे तुपकर म्हणाले.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर तुपकरांनी जोरदार हल्लाबोल केला. “पाच हजार रुपयांत दिवाळी होते का? शेतकऱ्याच्या सोयाबीनला एकरी एक लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्याच्या हातात काय उरलं? संसार कसा चालवायचा? मुलांचं शिक्षण कसं करायचं? कर्ज कसं फेडायचं? सरकारने जाहीर केलेली पाच हजारांची मदत आम्हाला मान्य नाही. आम्हाला हेक्टरी एक लाख रुपयांची मदत हवी आहे. त्यासाठी हेक्टरची कोणतीही मर्यादा नको. शेतमजूर आणि भूमिहीनांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “दुष्काळाचा सामना करण्याचा ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलेला नाही. दुष्काळ सगळ्यांनी सहन केला पाहिजे. आमदार-खासदारांचे पगार थांबवा. शेतकऱ्याला संकटात टाकून बाकी सगळ्यांनी सुखात राहायचं, हे चालणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

सोयाबीन आणि कापसाच्या दरावरूनही तुपकरांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकार सोयापेंड आयात करण्याच्या तयारीत आहे. हा निर्णय घेऊ नका. आयात करण्याऐवजी निर्यातीला प्रोत्साहन द्या. सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव द्या. कापसावरील आयात शुल्क शून्य केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ते आयात शुल्क ३० टक्के करा. कापसाला प्रतिक्विंटल १७ हजार रुपये भाव द्या,” अशा मागण्या त्यांनी केल्या.

खासगी फायनान्स कंपन्या, मायक्रोफायनान्स संस्था, बँका आणि पतसंस्थांकडून सुरू असलेल्या कर्जवसुलीच्या मुद्द्यावर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली. “इतकी वर्षे तुम्ही शेतकऱ्यांच्या भरवशावर पैसा कमावला. यंदा दुष्काळ आहे, तर तुम्हीही आमच्यासोबत दुष्काळ सहन करा. शेतकऱ्यांच्या दारात जाऊन बसू नका. त्यांचा अपमान करू नका. जबरदस्तीने वसुली करू नका. नाहीतर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा,” असा इशारा त्यांनी दिला. यावेळी राज्य सरकारलाही तुपकरांनी सुनावले. “फायनान्सवाले आणि आमच्यात भांडण लावू नका. फायनान्स कंपन्यांची बैठक घ्या. तडजोडीचा मार्ग काढा. शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ देऊ नका. ओटीएस योजनेमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले आहे. कर्जमुक्तीचे तीनतेरा वाजले आहेत. आता सरसकट कर्जमुक्ती करा,” अशी मागणी त्यांनी केली. “दुष्काळ संपेपर्यंत आम्ही एक रुपयाही देणार नाही,” अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली. “पुण्या-मुंबईत २४ तास वीज देता, मग ग्रामीण भागात काय जनावरं राहतात का? शेतकऱ्यांनाही २४ तास वीज मिळाली पाहिजे,” असे ते म्हणाले. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीकविम्याचा प्रश्न मार्गी लावावा, महिला बचतगटांचे कर्ज माफ करावे आणि दुष्काळग्रस्तांना तातडीने दिलासा द्यावा, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या.

“जो बात रविकांत तुपकर करता है, वो चार-पाच दिन बाद दूसरा नेता करता है!” असे म्हणत त्यांनी राजकीय नेत्यांना टोलाही लगावला. “आम्ही हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा हिशोब मांडला. त्याआधी इतर नेते हेक्टरी ५० हजार रुपयांची मागणी करत होते. त्यानंतर त्यांनीही आपली मागणी बदलली,” असे तुपकर म्हणाले. दुष्काळ संघर्ष यात्रा ज्या गावांतून जाणार आहे, त्या गावांत आता इतर नेत्यांचेही दौरे सुरू झाल्याचे सांगत “इतना डर होना चाहिए!” असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या संघटनात्मक ताकदीबाबत बोलताना तुपकरांनी खंत व्यक्त केली. “आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत, आयपीएस अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत, अंगणवाडी सेविकांच्या संघटना आहेत. प्रत्येक घटक आपल्या हक्कांसाठी एकत्र येतो. पण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र एकत्र येत नाही. त्यामुळेच त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं,” असे ते म्हणाले. ही लढाई केवळ नुकसानभरपाई किंवा कर्जमाफीपुरती मर्यादित नसून संपूर्ण गावगाडा वाचवण्याची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दुष्काळ संघर्ष यात्रेची रूपरेषा सांगताना तुपकरांनी ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाबाबतही भूमिका मांडली. “४ डिसेंबरला बुलढाण्यात या. घरात थांबू नका. प्रत्येक घरातील शेतकरी, शेतमजूर बुलढाण्यात दिसला पाहिजे. सरकारला आपली ताकद दाखवायची आहे. हा संघर्ष आपल्या हक्कांचा आहे, आपल्या अस्तित्वाचा आहे, गावगाडा वाचवण्याचा आहे,” असे आवाहन त्यांनी केले. “नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे. पाच हजार, सतरा हजार रुपयांची मदत आम्हाला मान्य नाही. आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर नागपूरचं अधिवेशन कसं होतं तेच पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.

सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली, तर त्यासाठीही मागे हटणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्यही तुपकरांनी केले. सभेच्या शेवटी रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना संघर्ष सुरू ठेवण्याचा शब्द दिला. “तुम्ही फक्त माझ्यासोबत उभे राहा. तुम्हाला न्याय मिळेपर्यंत मी लढाईचं मैदान सोडणार नाही. सरकारवर दबाव निर्माण करून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ,” असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला वीरपत्नी सुषमा राजपूत, त्यांचे पुत्र जय व शुभम राजपूत, ॲड. हरीश रावळ, ॲड. प्रवीण सुरडकर, जालना जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती डॉ. अप्पासाहेब कदम, बालू शर्मा, ईश्वर पाटील, भगवानराव मोरे, गजानन भोपळे, राजीव कसबे, ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, सचिन शिंगोटे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिक आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, ॲड. प्रवीण सुरडकर यांनी वासुदेवाची भूमिका साकारून यात्रेत सहभाग नोंदवला.शहीद जवानाच्या स्मारकाला अभिवादन, वीरपत्नीच्या हस्ते हिरवी झेंडी, नांगराचे पूजन, माजी सैनिकांची उपस्थिती आणि सरकारविरोधातील आक्रमक भाषण अशा वातावरणात मलकापूर येथून दुष्काळ संघर्ष यात्रेचा प्रारंभ झाला. आता पुढील २१ दिवस रविकांत तुपकरांचा 'लोकरथ' बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील अनेक गावांत पोहोचणार आहे. गावागावांत शेतकऱ्यांशी संवाद, सभा, जनजागृती आणि दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जाणार आहे. मलकापुरातून सुरू झालेला हा संघर्ष ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यातील एल्गार महामोर्चाच्या माध्यमातून आणखी तीव्र करण्याचा निर्धार तुपकरांनी व्यक्त केला आहे.