अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती खालावली ; छ. संभाजीनगर येथील एम.जी.एम रुग्णालयात उपचार सुरू....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तब्बल चार दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. दरम्यान काल ०७ सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या बैठकीच्या निमंत्रणावरुन त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. सिंदखेडराजा येथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथे तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. 
 सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात ४ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. सलग चार दिवस रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती चांगलीच बिघडली होती. दरम्यान राज्य शासनाने या आंदोलनाची दखल घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी रविकांत तुपकर मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक लावली आहे. ना.पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले. 
तुपकरांची प्रकृती खालावल्याने उपस्थित डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचाराचा दाखल होण्याचे सांगितले. त्यामुळे सहकाऱ्यांनी रविकांत तुपकर यांना उपचारासाठी घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविकांत तुपकरांची शुगर लेवल अत्यंत कमी झाली असून थ्रोट इन्फेक्शन व किडण्यांवरही परिणाम झाला आहे. डॉक्टरांनी तुपकर यांच्यावर उपचार सुरू केले असून त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगितले. दरम्यान माझ्या प्रकृतीची चिंता करू नका शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन लवकरच बाहेर पडणार आहे. माझ्या भेटीसाठी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरला येऊ नये, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.