पिकविम्यासाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक ; कृषी कार्यालयात तीन तास ठिय्या...!कृषिमंत्री ना.कोकाटे व कामगार मंत्री ना.फुंडकरांशी तुपकरांची फोनवरून चर्चा...

 
   पिकविमा आणि नुकसान भरपाईसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. अगदी गल्लीपासून ते मुंबईपर्यंत त्यांनी आक्रमक आंदोलने केली आहेत. गेल्या महिन्यातच त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयात धडक दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आक्रमक होत रविकांत तुपकरांनी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा करण्याची मागणी आक्रमपणे केली. यावेळी त्यांनी राज्याचे कृषिमंत्री ना.ॲड.माणिकरावजी कोकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून चर्चा केली.
बुलढाणा जिल्ह्यात AIC पिकविमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या १ लाख २६ हजार २६९ शेतकऱ्यांना अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. त्याचबरोबर खरीप हंगामात चुकीचे कारणे देवून अपात्र केलेल्या ७० हजार ८३१ शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे कंपनीने मान्य केले आहे. 'त्या' शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पिकविम्याचा मोबदला दिला नाही. पिकविम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २३३ कोटी ८३ लक्ष रु. रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे.
तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी आमची आग्रही मागणी आहे. परंतु शासनाकडून उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम जमा करू, असे कंपनीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाकडे बाकी असलेला कंपनीचा हिस्सा उपलब्ध करून देत वंचित शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम देण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी कृषिमंत्री मा.ना.ॲड.माणिकरावजी कोकाटे यांच्याकडे केली. त्यावर उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्याचे आश्वासन कृषिमंत्री महोदयांनी दिले आहे. त्यानंतर रविकांत तुपकरांनी कॅबिनेट मंत्री मा.ना.आकाशजी फुंडकर यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली व उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत बुलढाणा जिल्ह्यातील प्रलंबित पिकविम्याचा प्रश्न लावून धरण्याची विनंती त्यांच्याकडे केली. दरम्यान दोन्ही मंत्री महोदयांनी उद्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने रविकांत तुपकर यांनी आपले ठिय्या आंदोलन तूर्तास मागे घेतले. लवकरच पिकविम्यासाठी राज्यव्यापी आक्रमक आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी रविकांत तुपकरांनी दिला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.