मेळघाट बफर झोनमध्ये ‘रामसेतू’ पादचारी पुलाला हिरवा कंदील; केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधवांच्या पाठपुराव्याला यश! ७४६ लाख रुपये खर्च करून बांधणार पुल....

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपूर तालुक्यातील वारी हनुमान ते सलवान दरम्यान प्रस्तावित ‘रामसेतू’ केबल-स्टेड पादचारी पुलाच्या उभारणीस अखेर वन विभागाने मान्यता दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागला आहे.

वारी हनुमान ते सलवान या मार्गावर सुरक्षित व सोयीस्कर पादचारी संपर्कासाठी पुलाची मागणी स्थानिक नागरिकांकडून दीर्घकाळापासून होत होती. मात्र, हे क्षेत्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाची परवानगी आवश्यक होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी वन मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत वन्यजीव विभागाकडून अखेर या पुलाच्या बांधकामास हिरवा कंदील मिळाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुलाची रचना (डिझाईन) अंतिम करण्यात आली असून निविदा प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे. सुमारे ७४६.४० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या केबल-स्टेड एफओबी पादचारी पुलाची उंची पायापासून अंदाजे ४५.८०० मीटर इतकी राहणार आहे.
या आधुनिक पुलामुळे वारी हनुमान ते सलवान दरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून पर्यटकांसह स्थानिक पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मेळघाट परिसरातील पर्यटनाला देखील या प्रकल्पामुळे चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.