"पाटी लावा बाबांनो! उमाळा कुठून जातं ते सांगाच" दिशादर्शक फलक नसल्याने प्रवाशांचा संभ्रम, ग्रामपंचायतीचा ठरावही दुर्लक्षित...
May 28, 2025, 16:01 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा तालुक्यातील उमाळा हे गाव गूगल मॅपवर सहज सापडते, पण प्रत्यक्ष प्रवासात ते गाव कुठून जावे हेच कळेनासे झाले आहे. कारण बुलढाणा–अजिंठा मुख्य रस्त्यावरून या गावाला वळण कुठे आहे, यासाठी कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नाही.
देऊळघाटपासून अवघ्या ३ कि.मी. अंतरावर असलेल्या उमाळा गावाकडे वळण आहे, पण ते कुठून? हा प्रश्नच राहतो. याच रस्त्यावर इतर गावांचे फलक लावले गेले आहेत, पण उमाळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, उमाळा ग्रामपंचायतीने ४ ऑक्टोबर २०२३ रोजी दिनकरराव सपकाळ यांच्या पुढाकाराने ठराव मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिशादर्शक फलक लावण्याची लेखी मागणी केली होती. सरपंच पंडीतराव सपकाळ, उपसरपंच अविनाश सपकाळ आणि सर्व सदस्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला. मात्र, आजतागायत यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
प्रश्न असा आहे की, उमाळा हे गावच प्रशासनाच्या नकाशावरून गायब तर झालं नाही ना? गावकऱ्यांच्या अपेक्षा, ठराव आणि मागण्या दुर्लक्षित का होत आहेत? स्थानिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर फलक लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.