मढ, जनूना , तराडखेड व गुम्मी साठी वीज उपकेंद्र द्या..! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांची मागणी...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंचनाची व्यवस्था उपलब्ध असतानाही केवळ अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बुलढाणा तालुक्यातील मढ, जनुना, तराडखेड व गुम्मी या गावांसाठी नवीन ३२ केव्ही वीज उपकेंद्र असणे आवश्यक आहे. यासंदर्भातील मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
उपरोक्त गावांना पाडळी व धाड या उपकेंद्रावर वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रांवर इतरही गावांचा लोड आहे. त्यामुळे बुलढाणा तालुक्यातील मढ, जनुना, तराडखेड व गुम्मी या गावांना अपुरा वीजपुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. या गावातील शेतकऱ्यांना अपुरी वीज मिळते. त्यामुळे पिकांना पाणी देण्यास उशीर होऊन बऱ्याच प्रमाणात पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी महावितरणाने पावले उचलावीत, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे गतीने काम होऊ शकते, असेही जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी याप्रसंगी चर्चा करताना सांगितले.
मढ, जनुना, तराडखेड व गुम्मी या गावांसाठी ३२ केव्हीचे नवीन उपकेंद्र मंजूर न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी तालुकाप्रमुख लखन गाडेकर, उपतालुकाप्रमुख विजय इतवारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख डॉ. अरुण पोफळे, बबन खरे, किशोर कानडजे, राहुल जाधव, अनिकेत गवळी, सागर हिवाळे, नवनाथ चव्हाण, दिगंबर दळवी, गजानन कानडजे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...