धाडच्या ग्रामीण रुग्णालयातील समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन; वैभवराजे मोहितेंचा इशारा; एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन व ब्लड स्टोरेज सेंटर सुरु करण्याची मागणी

 
 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाड (ता.बुलढाणा) येथील परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी निर्माण करण्यात आलेल्या धाड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना अत्यावश्यक सुविधा मिळत नसल्याने त्यांना यमयातना भोगाव्या लागत आहेत. धाडचे हे रुग्णालय रुग्णालय राहीले नसनू समस्यालय झाले आहे. परिणामी गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांना शारिरीक, मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कुत्रिम समस्या तत्काळ मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सकांसह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय आयुष मंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, धाड (ता.बुलढाणा) येथील ग्रामीण रुग्णालयावर परिसरातील ५२ खेड्यागावांसह लगतच्या मराठवाड्यातील अनेक गावांची आरोग्यसेवा अवलंबुन आहे. प्रशस्त ईमारतीत सुरु असलेल्या या रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री व तंत्रज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे रुग्णांचे शारिरीक, मानसिक हाल होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रुग्णालयात एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, दंत तपासणी मशीन व सदर मशीन हाताळणारे तंत्रज्ज्ञ उपलब्ध नाही. बेबी वॉर्मर मशीन उपलब्ध असून तंत्रज्ज्ञ नसल्याने सदर मशीन धूळ खात पडली आहे. करोडो रुपये खर्च करुन या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅंट उभारण्यात आला. मात्र, सदर प्लॅंट चालविण्यासाठी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे सदर पूर्णत: बंद आहे. शासनाने ब्लड स्टोरेजचे दोन फ्रिजर उपलब्ध करुन दिले. मात्र, तंत्रज्ज्ञ नसल्याने तेही बंद पडलेले आहे. 
  बायोवेस्ट मटेरीयल उघड्यावर जाळण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मॉड्यूलर अद्यावत प्रसुतीगृह गेल्या वर्षभरापासून बंद पडलेले असून शवपेटी देखील उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयात उपरोक्त मशीन, तंत्रज्ज्ञ व प्रशासनाचे नियोजन नसल्याने गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवा मिळणे दुरापास्त झाले असून त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असल्याचे निवेदनात नमुद असून उपरोक्त सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केली आहे. आठ दिवसांत सुविधी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाअंती देण्यात आला आहे.