मुद्दल फेडलं, व्याजही दिलं; तरीही सावकारांचा तगादा संपेना! अवैध सावकारीच्या विरोधात नांद्राकोळीत एल्गार; २६ नोव्हेंबरला जनजागृती आंदोलन, सावकारग्रस्तांना एकवटण्याचे आवाहन!

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अव्वाच्या सव्वा व्याजदर, वसुलीसाठी धमक्या, शिवीगाळ, सामाजिक बदनामी आणि मानसिक छळ... अवैध सावकारीच्या विळख्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता नांद्राकोळी येथे अवैध सावकारीविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. सावकारांच्या जाचाला बळी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्यात अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य निर्माण व्हावे, या उद्देशाने गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी नांद्राकोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकदिवसीय जनजागृती आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार असून, यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

व्यवसाय उभा करण्यासाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी, नोकरीसाठी अथवा कौटुंबिक अडचणींमुळे अनेक नागरिक नाइलाजाने खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. मात्र, अडचणीच्या काळात घेतलेले हे कर्ज पुढे आयुष्यभराचे ओझे बनत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. काही अवैध सावकारांकडून १० ते ३० टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. व्याज भरण्यास एक दिवस जरी उशीर झाला, तरी अतिरिक्त दंड आणि वाढीव व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. मुद्दल आणि व्याजाची परतफेड केल्यानंतरही पैशांसाठी तगादा लावला जातो. पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यास धनादेश अनादरित करण्याची धमकी, खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती, शिवीगाळ आणि सामाजिक बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले घर, शेती आणि व्यवसाय विकण्याची वेळ सर्वसामान्यांवर येऊ नये, सावकारीच्या जाचामुळे कोणत्याही कुटुंबावर आत्महत्येसारखी दुर्दैवी वेळ ओढवू नये, यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. सावकारग्रस्त नागरिकांना धीर देण्यासह शासन व प्रशासनाकडे निर्भयपणे तक्रारी दाखल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अवैध सावकारीविरोधात कायदेशीर लढा उभारण्यासाठी पीडितांना संघटित करण्याचाही मानस आहे. भविष्यात कोणत्याही नागरिकाला अवैध सावकारीचा बळी ठरावे लागू नये, यासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या सामाजिक लढ्यात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच सावकारग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन आंदोलनकर्ते समाधान जाधव यांनी केले आहे.