सहायक कृषी अधिकारी मयुरी ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली शेळगाव आटोळ येथे खरीपपूर्व नियोजन सभा संपन्न!

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि विविध योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचावी, यासाठी शेळगाव आटोळ येथे दिनांक १२ मे २०२६ रोजी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले. ही सभा सहायक कृषी अधिकारी कु. मयुरी ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली.

सभेमध्ये खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः मागील वर्षी चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या होण्याअळीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. अळीचे जीवनचक्र, पिकांवरील परिणाम, खाण्याची पद्धत तसेच नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.
यावेळी महाडीबीटी पोर्टलवरील विविध कृषी योजना, महा कृषी एआय अ‍ॅप, मग्रारोहयो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तसेच एल निनोच्या संभाव्य परिणामांविषयीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सहायक कृषी अधिकारी कु. मयुरी ठेंग यांनी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानाचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सभेला शेळगाव आटोळ येथील सरपंच, गावातील प्रमुख मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सहायक कृषी अधिकारी सौ. ए. एस. खेडकर, सहाय्यक कृषी अधिकारी जी. डी. सवडकर आणि सहाय्यक कृषी अधिकारी एल. एस. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.