

कामचुकार आरोग्य यंत्रणेवर 'प्रहार'चा प्रहार! धाड मध्ये अनोखे आंदोलन; "आरएमओ"सह वैद्यकीय अधीक्षकांना रुग्णालयातच कोंडले.....
Apr 9, 2025, 20:07 IST
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या धाड ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक सुविधांअभावी रुग्णांना यमयातना भोगाव्या लागत आहेत. रुग्णालय नव्हेतर समस्यालय बनलेल्या धाड ग्रामीण रुग्णालयात प्रशासनानेच निर्माण केलेल्या कुत्रिम समस्या मार्गी लावण्यात याव्यात, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष चांगलाच आक्रमक झाला. जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात संतप्त 'प्रहरीं'नी रुग्णालयाचा ताबा घेऊन स्वतःसह "आरएमओ" आणि वैद्यकीय अधीक्षकांना तब्बल ६ तास रुग्णालयातच कोंडून घेतले. दरम्यान, आंदोलनाची दखल घेऊन आंदोलनस्थळी पोहोचलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी उपरोक्त मागण्या पंधरा दिवसांत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
धाड (ता. बुलढाणा) ग्रामीण रुग्णालयावर परिसरातील ५२ खेड्यागावांसह लगतच्या मराठवाड्यातील अनेक गावांची आरोग्यसेवा अवलंबुन आहे. प्रशस्त ईमारतीत असलेल्या या रुग्णालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री व तंत्रज्ज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे रुग्णांचे शारिरीक, मानसिक हाल होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रुग्णालयात एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, दंत तपासणी मशीन व सदर मशीन हाताळणारे तंत्रज्ज्ञ उपलब्ध नाही. बेबी वॉर्मर मशीन उपलब्ध असून तंत्रज्ज्ज्ञ नसल्याने सदर मशीन धूळ खात पडली आहे. करोडो रुपये खर्च करुन या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅट उभारण्यात आला. मात्र, सदर प्लॅट चालविण्यासाठी विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली नाही. शासनाने ब्लड स्टोरेजचे दोन फ्रिजर उपलब्ध करुन दिले. मात्र, तंत्रज्ज्ज्ञ नसल्याने तेही बंद पडलेले आहे.मॉड्यूलर अद्यावत प्रसुतीगृह गेल्या वर्षभरापासून बंद पडलेले असून शवपेटी देखील उपलब्ध नसल्याने उपरोक्त समस्या तत्काळ मार्गी लावण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांसह जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, केंद्रीय आयुष मंत्र्यांकडे करण्यात आली होती. उपरोक्त मागण्यांची पुर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, आरोग्य प्रशासनाने उपरोक्त समस्या मार्गी न लावता केवळ कागदी घोडे नाचविण्यात धन्यता मानल्याने संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी आज ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. समस्यांसदर्भात जाब विचारत वैद्यकीय अधीक्षकांसह निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोंगटे यांना तब्बल ६ तास रुग्णालयातच कोंडून घेतले.
आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी आंदोलनस्थली भेट देऊन आंदोलकांसोबत चर्चा केली. नव्हे तर बेबी वॉर्मर, मॉड्युलर प्रसूती गृह तात्काळ सुरू करण्याचे आदेश देऊन दंत चिकित्सकांची जागेवरच प्रतिनियुक्ती केली. सोबत सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीन, ऑक्सिजन प्लांट येत्या पंधरा दिवसांत सुरू करण्यासह शवपेटी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकांनी तुर्तास सदर आंदोलन मागे घेतले. निर्धारीत कालावधीत उर्वरित समस्या निकाली न काढल्यास अधीक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी वैभवराजे मोहिते यांनी दिला.
आंदोलनात जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रदीप टाकसाळ,चिखली तालुका प्रमुख सुनील वाघ,विभागप्रमुख गणेश जाधव, सोनू वाघ, पिंटू उबाळे, भाजपाचे विशाल विसपुते, ऋषी वाघ,पवन बामदळे, प्रदीप तायडे,बबन कानडजे, शुभम कुटे, राजू भिंगारे, अजय शिंदे, अमोल माळोदे, निलेश चिंचोले,राजू शिंदे, धीरज सरोदे, शुभम मोहिते, सुभाष मोहिते, आकाश जाधव, गोपाल बोराडे,ऋषिकेश बोराडे,विशाल मोरे, आकाश गुजर,राजू ढोले, वैभव सोनूने,आकाश तोटे, वैभव कोप्पे, दिलीप उबाळे, राहुल रोकडे,वैभव माळोदे, गणेश ताठे,रामेश्वर ताठे, रामू ठाकरे,शेषराव ठाकरे, गोटू पवार,अरविंद गुजर, उमेश घाडगे, सचिन नेमाने, यशवंत जाधव, मोहन निकम, संतोष अपार, पवन कदम, तनवीर मिर्झा, विश्र्वास मोहिते, कल्याण वाघ, विठ्ठल दांडगे, सचिन गायकी, जिवन वाघ, अजय गायकी, अजय वाघ, शिवराज शिंदे, सागर कासोद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रुग्णांना त्रास होणार नाही, याची घेतली काळजी
दरम्यान, आंदोलन सुरु असतांना रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणताच त्रास होणार नाही, याची काळजी आंदोलकांकडून घेण्यात आली. त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरु होते, सोबतच आंदोलनही सुरू होते, हे विशेष!