“शेतकऱ्यांसाठी राजकारण बाजूला; सत्तेत असलो तरी रविकांत तुपकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभा!” माजी आमदार दिलीपकुमार सानंदांचा गणेशपुरात जाहीर पाठिंबा;
दुष्काळ संघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी तुपकरांचे रुम्हणे देऊन स्वागत...! म्हणाले, “सरकारने दिलेला शब्द पाळावा; स्व. अजितदादा असते तर...”
यावेळी बोलताना दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, “मी सत्ताधारी पक्षात असलो तरी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देताना कोणाचीही पर्वा करत नाही. आंदोलन सरकारच्या बाजूने असो किंवा सरकारच्या विरोधात, मागणी रास्त असेल तर मी त्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहतो. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे.” विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावेळी कोणतेही निकष सांगितले नव्हते. त्यामुळे सरकारने दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याचवेळी सानंदा यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. “अजितदादा वित्तमंत्री होते. ते दिलेला शब्द पाळणारे नेते होते; परंतु आज ते आपल्यात नाहीत. सरकारने शेतकऱ्यांना जो शब्द दिला होता, तो आता तरी पूर्ण करावा,” अशा शब्दांत त्यांनी अजितदादांची आठवण काढत सरकारला आश्वासनाची जाणीव करून दिली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत अत्यंत तोकडी असल्याचे सांगत सानंदा म्हणाले की, पाच हजार रुपयांत कोणत्याही शेतकऱ्याची दिवाळी होऊ शकत नाही. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले, प्रत्यक्ष भेटूनही शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याची मागणी केली. रविकांत तुपकर यांनी केलेली हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी रास्त असून या मागणीलाही आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि पंचनामे होऊनही मदतीची रक्कम न मिळाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
रविकांत तुपकर यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांना उजाळा देताना सानंदा म्हणाले की, जिल्हा बँकेविरोधातील आंदोलनापासून आपण तुपकर यांच्या संघर्षात सहभागी होत आलो आहोत. तुपकर यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले, त्यावेळीदेखील आपण सत्तेत असूनही त्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला होता. संबंधित मंत्र्यांशी त्यांचे बोलणे करून देण्यासाठीही पुढाकार घेतला होता. तुपकर सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असून संघर्षाच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे सानंदा यांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीतही तुपकर यांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. “रविकांत तुपकर यांच्या लढ्याला यश मिळाले पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहावे. ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला शेतकऱ्यांची एकजूट दाखवून द्यावी,” असे आवाहनही सानंदा यांनी केले. या संघर्षात आपलाही खारीचा वाटा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, रविकांत तुपकर यांनीही दिलीपकुमार सानंदा यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “आम्ही यापूर्वी उपोषण केले, त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांपैकी सानंदा साहेब आम्हाला भेटायला आले होते. आज दुष्काळ संघर्ष यात्रा खामगाव तालुक्यात आल्याचे समजताच त्यांनी स्वतः फोन करून गणेशपूरला किती वाजता पोहोचणार, अशी विचारणा केली. तुमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आणि तुमचे बळ वाढवायला आम्ही येतोय, असे त्यांनी सांगितले. यासाठी मर्दानी काळीज लागतं!” अशा शब्दांत तुपकर यांनी सानंदा यांना धन्यवाद दिले.